रेल्वेच्या संगणकीकृत आरक्षण केंद्रामध्ये चालणारे गैरप्रकार रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पाच विशेष पोलीस पथके तैनात केली आहेत. आरक्षण केंद्रातील गैरप्रकार रोखण्याबरोबरच गाडीबाहेर स्टंट करणाऱ्यांच्या विरोधातही कारवाई करणार आहे.
आरक्षण केंद्रांमध्ये येणारे प्रवासी आणि काळाबाजार करणारे दलाल यांच्यातील शाब्दिक चकमकी अनेकदा हातघाईवर येत असतात. दलालांच्या टोळ्या एकटय़ादुकटय़ा प्रवाशांवर हल्लेही करतात. त्यांना रेल्वे पोलिसांचेहीअनेकदा संरक्षण मिळाले आहे. अद्यापही आरक्षण केंद्रामध्ये गैरप्रकार होत आहेत, अशा काही तक्रारी रेल्वे प्रशासनाकडे आल्या असून हे गैरप्रकार रोखण्यासाठी आणखी कठोर कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
छत्रपती शिवाजी टर्मिनस, विक्रोळी, ठाणे, कल्याण, उल्हासनगर येथे झालेल्या अशा प्रवासी आणि दलालांमधील मारामारीच्या प्रकारांनंतर रेल्वे पोलीस दलाच्या (आरपीएफ) पाच विशेष पथकांची स्थापना करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाचे आयुक्त आलोक बोहरा यांनी यास दुजोरा दिला आहे.
या पथकांनी कामही सुरू केले असल्याचे सांगितले. ही पथके आरक्षण केंद्रातील गैरप्रकार रोखण्यासाठी केवळ गस्त घालणार नाहीत, तर काही संवेदनक्षम केंद्रांवर अचानक तपासणी करतील आणि तेथे रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांच्या कागदपत्रांचीही तपासणी करतील, असे सूत्रांनी सांगितले.