शालेय बस, व्हॅन, रिक्षा, दुचाकींविरोधातील विशेष राज्यव्यापी मोहिमेत २ हजार ९३६ वाहने दोषी

नियम धुडकावून घर ते शाळा अशी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसगाडय़ा, व्हॅन, रिक्षा आणि दुचाकींवर परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारला असून राज्यभरात अशा तीन हजार वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. मुंबई-पुण्यात कारवाईचे प्रमाण फारसे नाही. परंतु, मुंबईला लागून असलेल्या ठाण्यात ३१४ वाहनांना कारवाईला सामोरे जावे लागले आहे.

या विशेष मोहिमेत २९३६ वाहनांमध्ये विद्यार्थ्यांना अवैध पद्धतीने नेले जात होते. यातील ४८७ वाहनांवर जप्तीची आणि अटकावाची कारवाई केली असून उर्वरित प्रकरणांत दंड आकारण्यात आला आहे. मुंबईत १५६, ठाण्यात ३१४, पनवेलमध्ये १९१ वाहनांवर कारवाई करण्यात आली. तर कोल्हापूर २६१, पुणे १५१, नाशिक १९९, धुळे १५३, औरंगाबाद २८१, अमरावती ३३९, नांदेड २१४, लातूर २६७, नागपूर शहर १७८, नागपूर ग्रामीण २३२ वाहनांवर कारवाई करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करताना शालेय बस आणि व्हॅनचालकांकडून वाहतूक नियम धाब्यावर बसवले जातात. तर ऑटोरिक्षांना शाळा वाहतूक सेवा म्हणून मुलांची वाहतूक करण्याची परवानगीच नाही. अशा वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच दिले. त्यानुसार परिवहन विभागाने २५ नोव्हेंबरपासून विशेष मोहीम हाती घेतली. यात रिक्षा व दुचाकींवरही कारवाई करण्यात आली.

या वाहनचालकांकडे विमा प्रमाणपत्र नसणे, अग्निशमन यंत्रणा आणि योग्यता प्रमाणपत्र नव्हते. काही ठिकाणी विनापरवाना वाहतूक होत होती. रिक्षांच्या चालकांकडे लायसन्स नसल्याचे दिसून आले. दुचाकीवरून शालेय विद्यार्थ्यांना हेल्मेटविना नेले जात होते. त्यामुळे तेही कारवाईतून सुटले नाहीत. दुचाकीचालक आसनक्षमतेपेक्षा जास्त वाहतूक होत असल्याचेही निदर्शनास आल्याचे परिवहन आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले.

बसगाडय़ांवरही कारवाई

एकूण ११८० शालेय बसगाडय़ांवरही कारवाई करण्यात आली. विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठीच्या नियमांचा त्यांनी भंग केला होता. यावेळी ३८ लाख रुपये दंड वसूल केला गेला.