दिल्लीत अपघाती निधन झालेले लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या अंतिम संस्कारासाठी कार्यकर्ते आणि समर्थकांना परळीला जाता यावे यासाठी मुंबई ते लातूर अशी विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून(सीएसटी) रात्री अकरा वाजता ही १६ डब्यांची विशेष रेल्वे सुटणार असून यामध्ये १२ जनरल डबे, १ थर्ड टायर एसी आणि उर्वरित तीन एसी डबे असणार आहेत.
फोटो गॅलरी: झुंजार नेत्याची उपमुख्यमंत्रीपदाची लक्षवेधक कारकीर्द
उद्या(बुधवार) चारच्या सुमारास बीडमधील परळी येथे गोपीनाथ मुंडे यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार होणार आहेत. यापार्श्वभूमीवर मुंबई परिसरातील कार्यकर्त्यांना अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहता यावे यासाठी ही विशेष रेल्वे उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला.
गोपीनाथ मुंडे यांचे आज सकाळी दिल्ली विमानतळावर जात असताना अपघाती निधन झाले. या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकूल आहे. दिल्लीतही अनेकांनी मुंडे यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात मुंडेंचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर उद्या सकाळी अंतिम संस्कारासाठी पार्थिव परळीसाठी रवाना होणार आहे.