News Flash

आरेच्या हरित पट्टय़ात ‘सिकाडा’ कीटकाचे दर्शन

दिवसाढवळय़ाही ऐकू येणारी किरकिर रातकिडय़ांची नसून ‘सिकाडा’ या कीटकाची असल्याचे उजेडात आले आहे.

सिकाडा’ कीटक

किरकिरणाऱ्या कीटकाच्या पाच प्रजातींचा शोध

मुंबई : आरे वसाहतीच्या हरित पट्टय़ात फिरताना दिवसाढवळय़ाही ऐकू येणारी किरकिर रातकिडय़ांची नसून ‘सिकाडा’ या कीटकाची असल्याचे उजेडात आले आहे. रातकिडय़ापेक्षाही वेगळय़ाच सुरात ऐकू येणाऱ्या या ‘किरकिर’चा माग घेत मुंबईतील तरुण संशोधकांनी ‘सिकाडा’च्या पाच प्रजातींचा

शोध घेतला आहे. या संशोधनामुळे आरे वसाहतीमध्ये अस्तिवात असलेल्या छोटय़ा कीटकांची जैवविविधता पुन्हा एकदा उजेडात आली आहे.

जैविक अन्नसाखळीत ‘सिकाडा’ कीटकाला महत्त्वाचे स्थान आहे. पक्षी आणि सरपटणाऱ्या जीवांच्या भक्ष्यामध्ये यांचा प्रामुख्याने समावेश आहे. मात्र एकूणच ‘सिकाडा’विषयी भारतामध्ये ठोस प्रकारचे संशोधन किंवा अभ्यास झालेला नाही. या पाश्र्वभूमीवर मुंबईतील संशोधक  राजेश सानप यांनी आरे वसाहतीत वर्षभर अभ्यास करुन त्या ठिकाणी अधिवास करणाऱ्या पाच सिकाडय़ांच्या प्रजातीचा उलगडा केला आहे. ‘पॅलीप्युला’, ‘खिंबिया’, ‘लेम्युरीनिया’ या पोटजातींमध्ये या पाच प्रजातींचा समावेश आहे.

आरेमध्ये वर्षभर केलेल्या निरीक्षणाच्या माध्यमातून सिकाडय़ाच्या किरकिराटाचे ध्वनिमुद्रण आणि त्यांचा छायाचित्रांचे संकलन केल्याची माहिती संशोधक राजेश सानप यांनी दिली. मात्र आढळलेल्या सिकाडय़ाच्या जातींविषयी शास्त्रीय माहिती मिळविण्याच्या दुष्टीने ही माहिती बंगळूरु येथील ‘नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्स’(एनसीबीएस) या संस्थेतील संशोधक  आणि भारतामध्ये सिकाडाच्या प्रजातीविषयी संशोधन केलेले तज्ज्ञ किरण मराठे यांच्याकडे पाठविण्यात आल्याचे सानप यांनी सांगितले. त्यानंतर माहितीअंतर्गत गोळा केलेली ध्वनिमुद्रणे आणि छायाचित्रे मराठे यांच्याकडे अस्तिवात असलेल्या ध्वनिमुद्रणे आणि छायाचित्रांशी जुळवून या पाच प्रजातींचा उलगडा केल्याचे सानप म्हणाले. संपूर्ण भारतामध्ये अस्तिवात असलेल्या सिकाडाच्या प्रजातीविषयी एकीकडे संशोधन सुरू आहे. त्यामुळे आरेसारख्या छोटय़ा हरित पट्टय़ामधून पाच प्रजातींचा उलगडा होणे, तेथील जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असल्याचे ‘एनसीबीएस’चे संशोधक किरण मराठे यांनी सांगितले. या दृष्टीने अधिक संशोधन होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. याशिवाय वृक्षतोड, मातीची झीज आणि शहरीकरण हे सिकाडाच्या अधिवासाला घातक असल्याचे मत सानप यांच्यासोबत काम करणाऱ्या संशोधिका अनुराधा जोगळेकर यांनी व्यक्त केले आहे.

‘सिकाडा’ची वैशिष्टय़े

*‘सिकाडा’चा किरकिराट विणीच्या हंगामात मादीला साद घालण्यासाठी सुरू असतो.

* या कीटकाची प्रजननाची प्रक्रिया मुख्य करुन तीन प्रक्रियेमध्ये पूर्ण होते.

* झाडांवर घातलेल्या अंडय़ामधून लारवा जमिनीवर पडतो. त्यानंतर या लारव्याची पौढत्वापर्यंतची पूर्ण वाढ ही जमिनीखालीच होते. पूर्ण वाढ झालेला लारवा जमिनीवर आल्यानंतर तो आपल्या विशिष्ट कोशामधून बाहेर पडून झाडांवर अधिवास करतो.

* प्रौढावस्थेतील या कीटकाचे आयुर्मान फार अल्प असते. काही वेळा मादीसोबतच्या संभोगानंतर नर सिकाडा गतप्राण होतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 3:26 am

Web Title: species of cicadas insect seen in aarey colony
Next Stories
1 ‘कूपर वैद्यकीय’ची मान्यता धोक्यात
2 प्लास्टिक बंदीसाठी ‘सदिच्छा दूतां’चा शोध
3 ५० लाखांसाठी अपहरणकृत्य ते बारावीतील यश