जकात नाक्यांवर गतिरोधक बसवण्याच्या फायलीचा संथगती प्रवास; भरधाव वाहनांमुळे कर्मचाऱ्यांना जिवाची भीती

जकात बुडवण्याच्या हेतूने जकान नाक्यांवरून भरधाव वेगाने पळवण्यात येणाऱ्या मालवाहू वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी जकात नाक्यांच्या परिसरात गतिरोधके उभारण्यासाठी जकात विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अर्ज, विनवण्या करूनही हे काम होऊ शकलेले नाही.  विविध यंत्रणांच्या कार्यालयात फेऱ्या मारून गतिरोधक उभारण्याची फाइल आता पालिकेच्या रस्ते विभागात विसावली आहे. मात्र तरीही जकात नाके गतिरोधकाच्या प्रतीक्षेतच आहेत. त्यामुळे भरधाव वेगात येणाऱ्या वाहनांकडून उडवले जाण्याच्या भीतीखालीच अधिकारी-कर्मचारी काम करत आहेत.

आसपासची राज्ये आणि शहरांमधून रस्तेमार्गे मालवाहू वाहनांमधून विविध प्रकारचा माल मुंबईमध्ये आणला जातो. मुंबईच्या वेशीवरील जकात नाक्यांवर येणाऱ्या मालवाहू वाहनांतील मालावर पालिकेमार्फत जकात कर वसूल केला जातो. मात्र या जकात नाक्यांवर मोठय़ा प्रमाणावर माफियांचे राज्य असून जकात बुडव्यांना त्यांच्याकडून मदत केली जाते. जकात हा पालिकेच्या उत्पन्नाच्या मुख्य स्रोतांपैकी एक आहे. जकातीचे उत्पन्न घसरू नये म्हणून काही महिन्यांपासून जकात नाक्यांवर भरारी पथके तैनात करण्यात आली. मात्र, जकात बुडवून पळणारी वाहने सुरुवातीला मोठय़ा जिद्दीने अडविणाऱ्या भरारी पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मनात काही दिवसांमध्येच जकात नाक्यांवरील दहशतीच्या वातावरणामुळे धडकी भरू लागली आहे. कोणत्याही स्वरूपाचे संरक्षण नसल्यामुळे जकात नाक्यावरून बदली मिळावी यासाठी अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांची आजही धडपड सुरू आहे.

जकात चुकवून पळ काढण्यासाठी वाहनचालक भरधाव वेगात वाहने हाकतात. अशा वेळी वाहने थांबविण्यासाठी रस्त्यात मध्येच उभ्या असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा अपघात होण्याची भीती असते. त्यामुळे पूर्व द्रुतगती मार्ग, मुलुंड; लालबहादूर शास्त्री मार्ग, मुलुंड; मानखुर्द, दहिसर आदी ठिकाणच्या जकात नाक्यांवर मोक्याच्या ठिकाणी वाहने थांबविण्यासाठी रस्त्यावर गतिरोधक उभारावे, अशी मागणी पालिकेच्या जकात विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत होती. या मागणीची दखल घेऊन प्रशासनानेही जकात नाक्यांवर गतिरोधक उभारण्याचा निर्णय घेतला; परंतु पालिकेसह विविध सरकारी यंत्रणांतील विभागांच्या टेबलांवरून अतिशय संथगतीने गतिरोधकांची फाइल सरकत असल्याने जकात नाक्यांवर अजूनही गतिरोधक नाही.

गतिरोधकाअभावी जकात नाक्याबाहेरील रस्त्यावरून भरधाव वेगात मालवाहू वाहने जकात बुडवून निघून जातात. मात्र ही वाहने अडविण्यासाठी जीव धोक्यात घालून काही अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उभे असतात; परंतु त्यांच्या जिवाची कुणालाच परवा नसल्याचे गतिरोधक उभारणीमधील दफ्तर दिरंगाईवरून दिसून येत आहे. त्यामुळे जकात नाक्यावरील काम नको म्हणण्याची वेळ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर आली आहे.

सरकारी गतिरोधक

  • मुंबईच्या वेशीवरील जकात नाक्यांजवळ गतिरोधक उभारण्यासाठी एमएमआरडीए, एमएसआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक विभाग आदी विविध यंत्रणांच्या परवानगीची गरज होती.
  • जकात विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परवानगी मिळविण्यासाठी संबंधित यंत्रणांशी पत्रव्यवहार केला. परवानगी मिळावी यासाठी विनंती, विनवण्याही केल्या.
  • परंतु आतापर्यंत केवळ दहिसर जकात नाक्यावर गतिरोधक उभारण्यात यश आले आहे.
  • अन्य जकात नाक्यांवर गतिरोधक उभारण्यासाठी सादर केलेल्या कागदपत्रांची फाइल सरकारी यंत्रणांच्या कार्यालयात एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर वारी करून आता पालिकेच्या रस्ते विभागात विसावली आहे.
  • मात्र तरीही अद्याप जकात नाक्यांवर गतिरोधक उभारण्यात आलेले नाही.