23 April 2019

News Flash

सावधान : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर स्पीड कॅमेरे बसले, अतिवेगास हजार रुपये दंड

ओव्हर स्पीडिंग आणि लेन कटिंगमुळे होणाऱ्या अपघातांवर नियंत्रणासाठी बेशिस्त चालकांवर होणार कारवाई

Speed Gun Cameras installed on Mumbai Pune Express way

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अपघातांना चाप लावण्यासाठी महामार्ग पोलिसांनी अतिवेगाने चालवणाऱ्या गाड्या टिपण्यासाठी स्पीड गन कॅमेरे कार्यान्वित केले आहेत. ओव्हर स्पीडिंग आणि लेन कटिंगमुळे एक्स्प्रेस वेवर अपघाताच्या वारंवार घटना घडत असतात. याची गंभीर दखल घेऊन अपघात होऊ नयेत म्हणून पोलिसांनी मुळावरच घाव घालण्यास सुरुवात केली आहे.

एक्स्प्रेस वेवर गाडी गेली की चालक अक्षरशः वेगाशी स्पर्धा करतात. 180 प्रतिकिलोमीटर किंवा त्यापेक्षाही जास्त स्पीडने गाडय़ा चालवल्या जातात. परिणामी अनेकदा चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून अपघात होतो, तर बऱ्याच वेळा अतिवेगात असताना गाडीचे टायर फुटून दुर्घटना घडते. अतिवेगाबरोबरच लेन कटिंगचीदेखील समस्या आहे. लेन कटिंगमुळेदेखील अपघात घडतात. अशा अपघातांमध्ये नियमांचं पालन करून जाणाऱ्या प्रवाशांनाही नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे याची गंभीर दखल घेऊन महामार्ग पोलिसांनी एक्स्प्रेस वेवर स्पीड गन इन ऍक्शन केले आहेत. हे कॅमेरे अतिवेगात जाणाऱ्या आणि लेनची शिस्त न पाळणाऱ्या गाडय़ांवर वॉच ठेवणार आहेत. आजपासून पोलिसांनी कॅमेऱ्याचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.

Speed Gun Cameras installed on Mumbai Pune Express way

“चालकांना दंड ठोठावणे हा कॅमेऱ्याचा वापर करण्यामागचा आमचा उद्देश नाही, तर चालकांना वाहतूक नियमांची शिस्त लावणे हा प्रमुख हेतू आहे. त्यासाठी आम्ही आता स्पीड कॅमेऱ्याचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. अपघात घडू नयेत हा आमचा प्रयत्न असून यासाठी ओव्हर स्पीडिंग आणि लेन कटिंगचे गुन्हे रोखणे आमचे टार्गेट आहे. चालक किती स्पीडमध्ये होता हे त्याला पुराव्यानिशी दाखवण्यासाठी कॅमेरा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे,” रूपाली अंबुरे-खैरमोडे, पोलीस अधीक्षक यांनी सांगितले.

स्पीड कॅमेरे ओव्हर स्पीडिंग आणि लेन कटिंग करणाऱ्या वाहनांचे फोटो काढणार आहे. मग हे फोटो टोलनाक्यावर तैनात असणाऱया पोलिसांकडील यंत्रणेकडे पाठवण्यात येणार आहेत. त्यानंतर पोलीस त्याची प्रिंट काढून संबंधित कारचालकाच्या हातात देऊन दंड करणार आहेत. यामुळे आम्ही स्पीडमध्ये नव्हतोच असा दावा करून चालकांना हुज्जत घालता येणार नाही. एक हजार रुपये अशी दंडाची रक्कम असून आज 17 चालकांवर ही कारवाई करण्यात आली आहे. लवकरच महामार्गाच्या दुतर्फा पोलीस व कॅमेऱ्याचा तुमच्यावर वॉच आहे. गाडय़ा सावकाश चालवा अशा सूचनांचे फलक लावले जाणार आहेत.

First Published on August 20, 2018 12:41 pm

Web Title: speed gun cameras installed on mumbai pune express way