News Flash

मोसमी वाऱ्यांना गती

बंगालच्या उपसागरामध्ये २३ मे रोजी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे.

मुंबई आणि कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. (संग्रहित छायाचित्र)

एकाच दिवसात श्रीलंकेपर्यंत मजल

पुणे : अंदमान आणि बंगालच्या उपसागरात शुक्रवारी (२१ मे) पोहोचलेले नैर्ऋत्य मोसमी वारे सध्या सुसाट आहेत. एकच दिवसात त्यांनी बंगालच्या उपसागराचा बहुतांश भाग व्यापून थेट दक्षिण श्रीलंकेपर्यंत मजल मारली आहे. अद्यापही या वाऱ्यांच्या प्रगतीला पोषक स्थिती कायम आहे.

मोसमी वाऱ्यांनी २१ मे रोजी अंदमान बेटांवर पोहोचले होते. निकोबार बेटांना त्यांनी व्यापले होते, तर बंगालच्या उपसागरात काही भागांत त्यांनी प्रगती केली होती. सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. या परिस्थितीचा फायदा मोसमी वाऱ्यांना मिळतो आहे. त्यामुळे एकच दिवसांत त्यांनी मोठ्या टप्प्यावर मजल मारली आहे. २२ मे रोजी मोसमी वारे अंदमान-निकोबार बेटांना व्यापून दक्षिण-पश्चिाम बंगालच्या उपसागरात पोहोचले. अगदी दक्षिण श्रीलंकेजवळ ते दाखल झाले आहेत.

बंगालच्या उपसागरामध्ये २३ मे रोजी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. त्याची तीव्रता वाढून २४ मे रोजी त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. चक्रीवादळ तयार झाल्यानंतर पुढील २४ तासांत ते तीव्र स्वरूप धारण करून उत्तर-पश्चिम दिशेने सरकणार आहे. समुद्रातून प्रवास करीत ते २६ मे रोजी सकाळच्या सुमारास ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर धडकणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

राज्यात सध्या अरबी समुद्रातून काही प्रमाणात बाष्पाचा पुरवठा होतो आहे. त्याचप्रमाणे मराठवाडा आणि लगतच्या भागामध्ये चक्रीय चक्रवात निर्माण झाला आहे. त्यातून राज्याच्या काही भागांत पावसाची शक्यता कायम आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत, तर कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या भागात पावसाची शक्यता आहे.

‘यास’ चक्रीवादळ अतितीव्र?

नवी दिल्ली : ‘तौक्ते’ चक्रीवादळानंतर आता लवकरच ‘यास’ चक्रीवादळ पूर्व किनाऱ्यांवर धडकणार असल्याचे वृत्त आहे. ‘यास’ चक्रीवादळ लवकरच अतितीव्र होणार असून ते २६ मे रोजी ओदिशा आणि पश्चिम बंगालचा किनारा ओलांडणार असल्याची माहिती शनिवारी हवामान विभागाने दिली आहे. रविवारी बंगालच्या उपसागराच्या पूर्व भागात कमी दाबाचे क्षेत्र केंद्रित होईल, हा पट्टा उत्तर वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे आणि सोमवारी चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता आहे.आणि त्यानंतर २४ तासांमध्ये ते अतितीव्र होण्याचा अंदाज आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2021 1:22 am

Web Title: speed to seasonal winds akp 94
Next Stories
1 उल्फाच्या अतिरेक्यांकडून ओएनजीसी कर्मचाऱ्याची सुटका
2 मुख्यमंत्र्यांचा आज बालरोगतज्ज्ञांशी संवाद
3 राज्यपाल नामनिर्देशित सदस्यांची अद्याप नियुक्ती का नाही?
Just Now!
X