मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर आता महामार्ग पोलिसांकडून या मार्गावरील बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. महामार्गावर स्पीडगन ठेवण्यात आल्या असून, त्या माध्यमातून वाहनांच्या वेगाची मोजणी करण्यात येत आहे. वेगाची मर्यादा ओलांडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासही सुरुवात झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून द्रुतगती मार्गावर सातत्याने वाहनांचे अपघात होत आहेत. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून, अत्यंत वर्दळीच्या या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याच्याही घटना घडू लागल्या आहेत. काही वाहनचालक वाहतुकीचे नियम पाळत नसल्यामुळे अपघाताच्या संख्येत भर पडत असल्याचे दिसून आल्यावर आता महामार्ग पोलीस खडबडून जागे झाले असून, त्यांनी महामार्गावरील वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस पथके नेमली आहेत. उर्से टोलनाका, कळंबोली यासह घाटामध्येही पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत. त्याचबरोबर स्पीडगनच्या साह्याने वाहनांच्या वेगावर लक्ष ठेवण्यात येते आहे.
दरम्यान, परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी द्रुतगती मार्गावरील विविध ठिकाणांची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या. द्रुतगती महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी पोलीस आणि परिवहन विभागाचे सुमारे तीनशे अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात येणार असून वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर जाचक नाही पण तापदायक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारीच दिली होती.
shinde-raote