राज्याचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी लाचलुचपतविरोधी विभागाकडून सुरू असून, ती अंतिम टप्प्यात आहे, असे या विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कर्णिक यांनी भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांना एका पत्राद्वारे कळविले आहे. तटकरे यांच्यावरील आरोपाच्या पुष्टय़र्थ सोमय्या यांनी गेल्या वर्षी असंख्य कागदपत्रांचा समावेश असलेल्या फायली लाचलुचपतविरोधी खात्याकडे सुपूर्द केल्या होत्या. त्यानंतर या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश लाचलुचपतविरोधी विभागाच्या महासंचालकांनी ऑगस्ट २०१२ मध्ये दिले असून तेव्हापासून चौकशी वेगात सुरू आहे. त्याखेरीज, सोमय्या यांनी गेल्या फेब्रुवारीतही २०८ पानांचा नवा अर्ज महासंचालकांकडे दाखल केला असून त्या अनुषंगानेदेखील चौकशी सुरू असल्याची ग्वाही कर्णिक यांनी सोमय्या यांना दिली आहे.