* खार लिंकिंग रस्त्यावरील घटना
* पाच जण जबर जखमी
‘प्रवेश निषिद्ध’ असलेल्या भागातून भरधाव गाडी चालवत दोन जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या होंडा अ‍ॅकॉर्ड गाडीच्या चालकाला पोलिसांनी बुधवारी अटक केली. मोबीन परमारे (३७) असे या चालकाचे नाव आहे. त्याला १८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
खार लिंकिंग रस्त्यावरील अमरसन्स जंक्शन येथे बुधवारी सकाळी नऊ वाजता ‘प्रवेश निषिद्ध’ असलेल्या क्षेत्रात होंडा अ‍ॅकॉर्ड गाडी भरधाव वेगात घुसली. क्षणार्धातच या भरधाव गाडीने एक रिक्षा व मोटारसायकलला धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की त्यात रिक्षाचालक चंद्रकांत तुपे (३०) आणि मोटारसायकलस्वार महेश अजवानी (४५) हे जागीच ठार झाले. महेश अजवानी हे वांद्रे येथे राहतात. मुलीला शाळेत सोडून ते मोटारसायकलीवरून घरी परतत होते.  सहा वाहनांनाही या गाडीने धडक दिली. या अपघातात होंडा अ‍ॅकॉर्ड गाडीतील ऑस्ट्रेलियन महिला रेहाना (३५) ही जबर जखमी झाली. तर रिक्षातील प्रवासी मंदाकिनी मोटे यांच्यासह अन्य चौघेही जखमी झाले. जखमींवर भाभा आणि लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे परिसरात काही काळ घबराट पसरली होती. उपस्थितांनी तातडीने होंडाचा चालक मोबीन परमारे याला पोलिसांच्या हवाली केले.  त्याला १८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून त्याने मद्यपान केले होते का, हे पोलीस तपासत आहेत. तसेच परमाने सतत आजारी असतो व त्याला नेहमी चक्कर येत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.

गाडी कोणाची?
दरम्यान, ही होंडा अ‍ॅकॉर्ड गाडी एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या व्यवस्थापकाच्या मालकीची असल्याचे समजते. जखमी झालेली रेहाना ही ऑस्ट्रेलियन महिला या व्यवस्थापकाची पत्नी असल्याची माहितीही पुढे आली आहे. गाडी घेऊन चालक मोबीन वरळी येथे जात होता.