गेल्या काही दिवसांत हवाई प्रवासी वाहतुकीत दर कमी करण्याबाबत स्पर्धा निर्माण झाल्यानंतर कंपन्यांकडून अनोख्या कल्पना राबविण्यात येताना दिसत आहेत. त्यामध्ये आता स्पाईस जेट या हवाई सेवा पुरविणाऱ्या कंपनीने प्रवाशांना केवळ एका रूपयात विमानातून प्रवास करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. स्पाईसजेटच्या देशांतर्गत विमानप्रवासातील मोजक्या हवाई मार्गांवरील एक लाख तिकीटासाठी ही सूट देण्यात आली आहे. त्यानुसार, प्रवाशांना १५ जुलै ते पुढील वर्षाच्या ३१ मार्चपर्यंत करण्यासाठी केवळ एका रूपयाचे शुल्क आकारले जाणार आहे. बुधवारपासून सुरू होत असलेल्या तीन दिवसांच्या या ऑफरमध्ये प्रवाशांना परतीचे तिकीटही बुक करावे लागेल, अशी अट घालण्यात आली आहे. दरम्यान, तिकीटांची या किंमतीमध्ये कर आणि इतर शुल्काचा समावेश नसल्याचे कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. स्पाईसजेटची ही ऑफर निवडक डायरेक्ट (नॉन-स्टॉप) डोमेस्टिक सेवांवर लागू होणार आहे.