मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अपघात झाल्याचं वृत्त आहे. मुंबईत आज(दि.६, शनिवार) सकाळपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळत होता. जोरदार वाऱ्यामुळे विमानतळावर पार्क असलेल्या इंडिगोच्या विमानाला स्पाइस जेटची शिडी धडकून अपघात झाला.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शनिवारी सकाळी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पार्क असलेल्या इंडिगो A320 या विमानाला स्पाइस जेटची शिडी धडकली. यामुळे स्पाइस जेटच्या शिडीचं बरंच नुकसान झालंय, तर इंडिगो विमानाच्या इंजिनच्या बाहेरील भागाचेही नुकसान झाले आहे. तसेच, विमानाच्या पात्यांचंही मोठं नुकसान झाल्याचं समजतंय. सकाळपासून सुरू असलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शिडी विमानाला धडकली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. याप्रकरणी मुंबई विमानतळ, इंडिगो किंवा स्पाइस जेट यांपैकी कोणीही अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

(सौजन्य- ट्विटर)

दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगर तसेच नवी मुंबई, ठाणे, कल्याण पट्ट्यात आज सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली. मुंबई उपनगर जिल्हा व ठाणे परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. पण आता काही तासांपासून पावसाने बहुतांश भागात विश्रांती घेतली आहे.