बॉलिवूड अभिनेता विंदू दारा सिंग याच्या निवासस्थानी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी छापे टाकले. स्पॉट फिक्सिंगप्रकरणी मुंबई पोलिसांनी विंदूला मंगळवारी दुपारी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावलीये. विंदूच्या निवासस्थानातून रोकड जप्त करण्यात आल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिले आहे.
जुहूमधील दारा व्हिला या इमारतीतील पाचव्या, सहाव्या आणि सातव्या मजल्यावर पोलिसांनी छापे टाकल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, विंदूच्या मोबाईल कॉल्सच्या माहितीवरून तो चेन्नई सुपर किंग्जचे प्रवर्तक गुरुनाथ मेयप्पन यांच्या संपर्कात होता, असे दिसून आले. मेयप्पन हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाचे मालक एन. श्रीनिवासन यांचे जावई आहेत. पोलिस मेयप्पन यांचीही याप्रकरणी चौकशी करण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.