सदनिका फाइल गायब प्रकरण

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे माजी मुख्य अधिकारी विश्वास पाटील यांनी जुहूतील झोपु योजनेत दोन आलिशान सदनिका लाटण्यासाठी पत्नीलाच विकासकासोबत भागीदार बनविण्याचा ‘आदर्श’ घोटाळा केल्याचे उघडकीस आल्यानंतर या प्रकरणातील महत्त्वाची फाइल प्राधिकरणातून गायब झाल्याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर यांनी दिले होते. आता दीड महिना होत आला तरी झोपुतील संबंधित अधिकाऱ्याने गुन्हा दाखल केलेला नाही.

उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरिक्त जिल्हाधिकारी असताना पाटील यांनी पत्नी चांद्रसेना यांना जुहूएकता झोपु योजनेच्या विकासकासोबत भागीदार बनविले. या भागीदारीच्या मोबदल्यात सरकारी सेवेत असतानाही पाटील यांनी पत्नीच्या नावे जुहूसारख्या आलिशान ठिकाणी ९२५.७९ चौरस फुटाच्या टेरेससह अनुक्रमे १६६१.६८ आणि १११९.५६ चौरस फुटाच्या दोन सदनिका पटकावल्या. याशिवाय चार पार्किंगचा लाभही मिळविला. जुहूच्या समुद्रकिनारी मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या सदनिकांची बाजारभावातील किंमत कोटय़वधी रुपयांच्या घरात आहे.

हा सकृतदर्शनी भ्रष्टाचार असल्याचे मत नोंदवत गृहनिर्माण विभागाचे तत्कालीन सचिव सीताराम कुंटे यांनी सखोल चौकशीची मागणी मुख्य सचिवांकडे २००९ मध्ये केली होती. अखेरीस कोकण विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी ही चौकशी पूर्ण केली आणि बेकायदेशीररीत्या लाभ मिळविणे, हितसंबंध व वर्तवणूकविषयक नियमांचा भंग केल्याचा ठपका पाटील यांच्यावर ठेवला. ही चौकशी पूर्ण होऊनही आता पाच वर्षे उलटली आहेत. परंतु पुढे काहीही होऊ शकले नाही.

पाटील यांनी अनेक मोक्याची आणि लाभाची पदेही पटकावली. याप्रकरणी माहिती अधिकारात माहिती मागविण्यात आली असता फाइल उपलब्ध नसल्याचे उत्तर प्राधिकरणाचे माहिती अधिकारी व उपअभियंता झेड. ए. शेख यांनी दिले. याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर यांनी दिले. परंतु झोपु अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करण्यास वेळ मिळालेला नाही वा गायब फाइलही अद्याप सापडली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत शेख यांना विचारले असता त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली.