नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी पालिका आयुक्तांचे संकेत

मुंबई : करोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर प्रतिबंधित करण्यात येणाऱ्या क्षेत्रांमधील नागरिक नियमभंग करीत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रात राज्य राखीव पोलीस दलाचे (एसआरपीएफ) जवान तैनात करण्याचे संकेत नवनियुक्त पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिले.

चहल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेतली. रुग्ण सापडल्यानंतर प्रतिबंधित करण्यात येणाऱ्या क्षेत्रांसाठी केलेल्या नियमांचे पालन अत्यंत काटेकोरपणे करावेत, असे आदेश आयुक्तांनी दिले. या क्षेत्रातील ‘फलनिष्पती केंद्रीय प्रभावी व्यवस्थापना’साठी सुसूत्रीकरणाची गरज आहे. तसेच या क्षेत्रातील प्रत्येक नागरिकांची तपासणी करावी. यासाठी पोलिसांच्या स्तरावर आवश्यक समन्वय साधावा, असे आदेश चहल यांनी दिले.

एकाच दिवसात मुंबईत ८७५ रुग्ण

मुंबई : मुंबईतील करोना संसर्गाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी दिवसभरात तब्बल ८७५ जणांना करोनाची लागण झाली. मुंबईतील करोनाबाधितांची एकूण संख्या साडेतेरा हजारांवर पोहोचली. रविवारी १९ करोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ५०८ झाली आहे. दरम्यान, राज्यात रविवारी करोनाचे १,२७८ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या २२,१७१ वर पोहोचली आहे.