दहावीची सामाजिकशास्त्राची प्रश्नपत्रिका फुटली; परीक्षेतील गैरप्रकार सुरूच

दहावी आणि बारावीच्या परीक्षा शिस्तबद्ध पद्धतीने होण्यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात येत असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात परीक्षेत गैरप्रकार सुरूच असल्याचे समोर येत आहे. उत्तरपत्रिका जळणे, रस्त्यावर कोऱ्या उत्तरपत्रिका सापडणे यांसारख्या प्रकारांसोबत मुंबई विभागात प्रश्नपत्रिका फुटण्याचे सत्रही सुरू असल्याचे दिसते आहे. सोमवारी दहावीची सामाजिकशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर सापडली. बारावीच्या रसायनशास्त्र विषयाच्या परीक्षेबाबत असाच प्रकार काही दिवसांपूर्वी उजेडात आला होता. मात्र याबाबत विभागीय मंडळाकडून राज्य मंडळाकडे आणि राज्य मंडळाकडून पोलीस तपासाकडे बोट दाखवणे सुरू आहे.

दहावीची सामाजिकशास्त्र विषयाची पहिल्या भागाची परीक्षा सोमवारी सकाळी ११ वाजता होती. मात्र, विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर सकाळी साडेनऊ वाजताच इंग्रजी माध्यमातील प्रश्नपत्रिका उपलब्ध झाली. कल्याणजवळील वरप गावातील ‘सेक्रेड हार्ट’ शाळेत हा प्रकार उघडकीस आला. शाळा प्रशासनाला एका निनावी फोनद्वारे प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती मिळाली होती. विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका असल्याचेही कळविण्यात आले. त्यानुसार केंद्रप्रमुखांनी शाळेतील विद्यार्थाचे मोबाइल तपासले असता मोबाइलमध्ये प्रश्नपत्रिका असल्याचे समोर आले. शाळेचे संचालक ऑल्विन अँथोनी यांनी याबाबत विभागीय मंडळाला कळवले. त्यानंतर साडेदहा वाजण्याच्या सुमारास मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यात आली. विद्यार्थ्यांच्या मोबाइलवरून मिळालेली प्रश्नपत्रिका आणि मूळ प्रश्नपत्रिका सारखी असल्याचेही समोर आले. या प्रकरणी केंद्रप्रमुख सुवर्णा अदाते यांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

खासगी शिकवण्या जबाबदार?

ज्या विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये प्रश्नपत्रिका सापडली त्यांच्याकडे या प्रकाराबाबत अधिक चौकशी करण्यात आली. त्यातून उल्हासनगर येथील एका खासगी शिकवणीमधील शिक्षिकेने ही प्रश्नपत्रिका पाठविल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. खासगी शिकवणीच्या शिक्षिकेकडे ही प्रश्नपत्रिका कशी आली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यापूर्वी बारावीच्या रसायनशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका फुटल्याबाबत चौघांना अटक करण्यात आली होती. त्या वेळीही यामध्ये खासगी शिकवणी वर्गातील शिक्षकांचा संबंध असल्याची चर्चा होती.

.. तरीही प्रश्नपत्रिका फुटलीच नाही

मुंबईत असा दुसरा प्रकार समोर आलेला असताना आणि राज्यात परीक्षांमध्ये गैरप्रकारांचे पेव फुटलेले असताना गैरप्रकार होत असल्याचे मान्यच न करण्याची भूमिका शिक्षण मंडळाने घेतली आहे. दहावीच्या सामाजिकशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वी तासभर विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर सापडली, ती मूळ प्रश्नपत्रिकेशी जुळली, प्रश्नपत्रिका कुठून आली याचीही प्राथमिक माहिती समोर आली, प्रश्नपत्रिका हजारो विद्यार्थ्यांना व्हॉट्सअ‍ॅपवरून पाठवण्यात आल्याचे दिसून आले तरीही शिक्षण मंडळ मात्र प्रश्नपत्रिका फुटलीच नाही, असे सांगत आहे. प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच विद्यार्थ्यांच्या हाती पडल्यास ती फुटली, असे मानून पुन्हा परीक्षा घेणे अपेक्षित असते. मात्र, पुन्हा परीक्षा घेणे टाळण्यासाठी मंडळाकडून आटापिटा करण्यात येत असल्याचे दिसते. याबाबत मुंबई विभागीय मंडळाकडून राज्य मंडळाकडे बोट दाखवले जात आहे, तर राज्य मंडळाकडून पोलीस तपासाचे कारण दिले जात आहे.

मुंबईमध्ये प्रश्नपत्रिका फुटल्याबाबतची माहिती मिळाली, मात्र अद्याप विभागाकडून काही अहवाल आलेला नाही. याबाबत पोलीस तपास सुरू आहे. पोलिसांकडून तपासाचा अहवाल मिळाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल. यापूर्वीच्या रसायनशास्त्राच्या परीक्षेबाबतचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे याबाबत काही निर्णय घेण्यात आलेला नाही.

शकुंतला काळे, अध्यक्ष, राज्य मंडळ

प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर मिळाली. त्याबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिका फुटली असे म्हणता येणार नाही. मात्र याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार राज्य मंडळाला आहेत.

– सुभाष बोरसे, सचिव, मुंबई विभागीय मंडळ