पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळवण्यात आयसीएसई-सीबीएसईचे विद्यार्थी आघाडीवर

||नमिता धुरी

‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’च्या (एसएससी) दहावीच्या विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून यंदा वाढवलेल्या पाच ते आठ टक्के  जागांचा फायदा आयसीएसई आणि सीबीएसई शाळांतील विद्यार्थ्यांनाच झाला आहे. टक्केवारीचा विचार करता एसएससीच्या ३५.५३ टक्के विद्यार्थ्यांनाच पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयात संधी मिळू शकली.

द्विलक्ष्यी अभ्यासक्रमाचे प्रवेश, मुख्य तीन फे ऱ्या आणि एक विशेष फेरी अशा एकूण पाच फे ऱ्यांमध्ये मिळून आयसीएसईच्या १२ हजार ९४९ विद्यार्थ्यांना जागावाटप झाले. त्यापैकी ४६ टक्के विद्यार्थी (५,९५७) पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. त्याखालोखाल सीबीएसईच्या १० हजार २८९ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. त्यापैकी ४५.८४ टक्के (४,७१७) विद्यार्थ्यांना पहिला पसंतीक्रम मिळाला. आयजीसीएसईच्या महाविद्यालय मिळवलेल्या १५०४ विद्यार्थ्यांपैकी ३७.६९ टक्के (५६७) विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले.

एसएससीचे संख्याबळ इतर मंडळांपेक्षा कितीतरी पटींनी अधिक आहे. मात्र त्या तुलनेत एसएससीच्या विद्यार्थ्यांना योग्य न्याय मिळू शक लेला नाही. पाचही फे ऱ्यांमध्ये मिळून एसएससीच्या तब्बल २ लाख ८३ हजार ५२ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले. त्यापैकी फक्त ३५.५३ (१ लाख ५८०) टक्के विद्यार्थ्यांनाच पहिल्या क्रमांकाचे महाविद्यालय मिळाले आहे. प्रत्येक फेरीत महाविद्यालय मिळवलेले प्रत्येक शिक्षण मंडळाचे विद्यार्थी आणि त्यापैकी पहिला पसंतीक्रम मिळवलेले संबंधित शिक्षण मंडळाचे विद्यार्थी यांची तुलना केली असता द्विलक्ष्यी अभ्यासक्रम आणि पहिली फेरी यांत सीबीएसईने बाजी मारली आहे.

दुसऱ्या पसंतीक्रमातही तळालाच

पहिला पसंतीक्रम न मिळाल्याने नाराज झालेल्या एसएससीच्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीक्रमावरही दिलासा मिळू शकलेला नाही. इथेही आयजीसीएसईचे विद्यार्थी आघाडीवर आहेत. त्याखालोखाल सीबीएसई, मग आयसीएसई आणि शेवटी एसएससी असा क्रम आहे. तिसऱ्या पसंतीक्रमाच्या स्पर्धेत द्विलक्ष्यी अभ्यासक्रम आणि तिसरी फेरी यांत एसएससीचे विद्यार्थी आघाडीवर आहेत. मात्र इतर फेऱ्यांपैकी दोन फे ऱ्यांमध्ये सीबीएसई आणि एका फेरीत आयजीसीएसईच्या विद्यार्थ्यांना तिसरा पसंतीक्रम मिळाला आहे.

अकरावीला प्रवेश देताना सर्व मंडळांची मूल्यमापन पद्धत एकसारखीच असायला हवी. शिक्षक आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेत भरभरून गुण देतात, हा आरोप काही अंशी खरा होता. मात्र त्यावर उपाय म्हणून तोंडी परीक्षा बंद करणे चुकीचे होते. तोंडी परीक्षेच्या गुणांवर नियंत्रण कसे ठेवता येईल आणि ते गुण फसवे होऊ नयेत यासाठी एखादी समिती नेमून चर्चा व्हायला हवी होती. निर्णय घेतल्यानंतर जी चर्चा झाली ती निर्णय घेण्यापूर्वी व्हायला हवी होती.

– सचिन गवळी, मनोहर हरिराम चोगले विद्यालय

शिक्षक अंतर्गत मूल्यांकनात मुलांना सढळपणे गुणदान करत असल्याची टीका होत होती. त्यावर उपाय म्हणून अंतर्गत मूल्यांकन बंद करण्यात आले. अंतर्गत मूल्यांकन पुन्हा सुरू केल्याने हा प्रश्न भविष्यात उद्भवणार नाही.– बसंती रॉय, माजी अध्यक्ष, मुंबई विभागीय शिक्षण मंडळ