जेईई-मुख्य, जेईई-अ‍ॅडव्हान्स आदी केंद्रीय प्रवेश परीक्षांप्रमाणे ‘राज्य शिक्षण मंडळा’मार्फत घेतल्या जाणाऱ्या दहावी-बारावी परीक्षेच्या नमुना उत्तरपत्रिकाही आता संकेतस्थळावर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. माहितीच्या अधिकाराखाली विचारण्यात आलेल्या एका अर्जाला उत्तर देताना उत्तरतालिका या ‘गोपनीय’ नसल्याचा निर्वाळा मंडळाने दिला आहे. त्यामुळे निकाल जाहीर झाल्यानंतर नमुना उत्तरपत्रिका संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी उपलब्ध होण्याच्या मार्गातील मोठा अडसर दूर झाला आहे.
परीक्षेच्या वेळेस प्रश्नपत्रिकेप्रमाणे प्रत्येक विषयाची नमुना उत्तरपत्रिकाही (मॉडेल अ‍ॅन्सर पेपर) तयार केली जाते. या उत्तरपत्रिकेच्या आधारे परीक्षक आणि नियामक उत्तरपत्रिका तपासतात. पण, माहितीच्या अधिकारात विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका उपलब्ध करून देण्यात येत असल्या तरी ‘गोपनीय’ म्हणून प्रत्येक विषयाच्या नमुना उत्तरपत्रिका पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना दिली जात नाही.
या वर्षी बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याची तक्रार करत मंडळाकडे फोटोकॉपी आणि पुनर्मुल्यांकनाकरिता अर्ज दाखल केले होते. त्यामुळे, पुण्याच्या ‘सजग नागरिक मंचा’तर्फे विवेक वेलणकर यांनी ‘केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा’प्रमाणे विद्यार्थ्यांना नमुना उत्तरपत्रिका उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीला ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’ने दाद न दिल्याने त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करून नमुना उत्तरपत्रिका मागितल्या. मात्र, या उत्तरपत्रिका ‘गोपनीय’ असल्याच्या नावाखाली मंडळाने देण्याचे टाळले. त्यावर वेलणकर यांनी मंडळाच्या सचिवांकडे माहिती देण्यासंदर्भात अपील सादर केले होते.
या अर्जावर सोमवारी सुनावणी झाली असता वेलणकर यांनी माहितीच्या अधिकाराखाली नमुना उत्तरपत्रिका गोपनीय व्याख्येत बसत नाहीत,  असा युक्तिवाद केला. आपल्या दाव्याच्या पुष्टीसाठी त्यांनी सीए परीक्षेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालाचा आधार दिला.

पारदर्शकतेला हरकत कशाची?
परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी विद्यार्थ्यांना नमुना उत्तरपत्रिका दिली गेली पाहिजे. सीबीएससीने तर जेईईचा निकाल लागण्यापूर्वीच या उत्तरपत्रिका आपल्या संकेतस्थळावर जाहीर केल्या होत्या. हीच पारदर्शकता राज्य शिक्षण मंडळांना आपल्या परीक्षांबाबत जपायला काय हरकत आहे. आतापर्यंत मंडळ उत्तरपत्रिका उपलब्ध करून देण्यास टाळाटाळच करीत होते. पण, उत्तरपत्रिका गोपनीय नाहीत, असा निर्वाळा मंडळानेच दिल्याने विद्यार्थ्यांना त्या उपलब्ध होण्याच्या मार्गातील अडसर दूर झाला आहे.   – विवेक वेलणकर