26 October 2020

News Flash

दहावीच्या सर्वच प्रश्नपत्रिका फुटलेल्या?

पोलिसांच्या तपासातून आणखी गैरप्रकार उघड

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

पोलिसांच्या तपासातून आणखी गैरप्रकार उघड

दहावीच्या सर्वच विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या होत्या, अशी धक्कादायक माहिती अंबोली पोलिसांच्या तपासात उघड झाली असून त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील अनागोंदी चव्हाटय़ावर आली आहे. पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी फिरोज खान याने मुंब्रा येथील किड्स पॅराडाइज शाळेतून एक ते १९ मार्चदरम्यान झालेल्या सर्वच प्रश्नपत्रिका फोडून आपल्याला पुरवल्या होत्या, अशी माहिती अटकेतील त्याच्या साथीदारांनी दिली आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे नियम डावलून अंबरनाथ, बदलापूरमधील २६ विद्यार्थ्यांना फिरोजने औरंगाबादमधील शाळेतून दहावीला बसवल्याचे आणि असे प्रकार त्याने पूर्वीही केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे परजिल्ह्य़ांतील या शाळांमध्येही चौकशी केली जाणार आहे.

१९ मार्च रोजी अंधेरीच्या स्वामी मुक्तानंद शाळेतील केंद्रावर परीक्षा देण्यासाठी आलेल्या आठ विद्यार्थ्यांच्या चौकशीतून समाजशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका फुटल्याचे उघड झाले. त्यांच्या चौकशीतून पोलिसांनी फिरोजला आणि त्यापाठोपाठ सातजणांना अटक केली. यात फिरोजच्या खासगी शिकवणीत विविध विषय शिकवणाऱ्या शिक्षकांचा समावेश आहे. सुरुवातीच्या चौकशी आणि तपासातून बीजगणित, भूमिती, समाजशास्त्र, विज्ञान १ आणि २ अशा पाच प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र आतीष कदम या अटकेत असलेल्या शिक्षकाने दहावीच्या सर्वच प्रश्नपत्रिका सकाळी सव्वानऊ वाजता आपल्याला फिरोजकडून व्हॉटसअपवर मिळाल्या होत्या, हे सांगितले. यात मराठी, इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकांचाही समावेश होता, असा दावा त्याने केला. याच आतीष कदमने फिरोजच्या सांगण्यावरून २६ विद्यार्थ्यांना औरंगाबादेतील परीक्षा केंद्रावर नेले होते. १९ मार्चच्या मध्यरात्री फिरोजला अटक झाल्यानंतर मात्र त्याच्या सर्वच साथीदारांनी मोबाइल बंद करून पलायन केले.

आतीषच्या चौकशीतून बरीच धक्कादायक माहिती अंबोली पोलिसांना मिळाली. अंबरनाथ, बदलापूरला राहाणारे २६ विद्यार्थी इथल्याच शाळांमधून नववी उत्तीर्ण झाले. दहावीच्या वर्षांसाठी फिरोजने त्यांना औरंगाबादेतील विद्याविकास शाळेत परस्पर दाखल केले. वर्षभर ही मुले आपापल्या घरी होती आणि फिरोजच्या ‘ब्रिलियन्ट क्लास’मध्ये शिकत होती. मात्र त्यांना दहावी परीक्षा देण्याची परवानगी मिळाली. त्यानुसार औरंगाबादेतील परीक्षा केंद्रावरून त्यांनी परीक्षा दिली. त्यासाठी फिरोजच्या सांगण्यावरून परीक्षेच्या दोन दिवस आधी या २६ विद्यार्थ्यांना बसने औरंबादला नेले. तेथील एका गेस्ट हाऊसमध्ये थांबवले. सकाळी सव्वानऊच्या सुमारास फिरोजकडून प्रश्नपत्रिका मिळाल्यावर या मुलांची विशेष शिकवणी घेतली. म्हणजे प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उजळणी करून घेतली. मुलांना परीक्षा केंद्रावर सोडले आणि तेथून पुन्हा गेस्ट हाऊसला आणले. दरवर्षी फिरोज अशा पद्धतीने काही विद्यार्थ्यांना परजिल्हयांमधील शाळांमध्ये दाखल करून घेतो. यंदा अन्य कोणी उपलब्ध नसल्याने त्याने मला मुलांसोबत औरंगाबादला धाडले, अशी माहिती आतिषने पोलिसांना दिली आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार दहावीची परीक्षा देण्यासाठी शाळेत किमान ७५ टक्के हजेरी असणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांने बाहेरून जरी परीक्षा दिली तरी केंद्र तो राहात असलेल्या ठिकाणीच येते. त्यामुळे या शाळेत मुलांना प्रवेश कसा मिळाला, हजेरी नसताना परीक्षा देण्यास अनुमती कशी मिळाली, प्रात्यक्षिक किंवा तत्सम चाचण्यांचे शाळेकडून दिले जाणारे गुण  त्यांना कसे मिळाले, याबाबत शाळेकडे चौकशी केली जाणार आहे.

फिरोज सध्या पेपरफुटीच्या अन्य गुन्ह्य़ात साकिनाका पोलिसांच्या ताब्यात आहे. ही नवी माहिती उघड झाल्याने त्याला पुन्हा ताब्यात घेऊन आर्थिक व्यवहारांसोबत परजिल्हयांमधील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्याचे कारण याबाबत चौकशी केली जाईल. पोलीस उपायुक्त परमजीतसिंग दहिया यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दया नायक आणि पथक या प्रकरणाचा तपास करत आहे.

मोठा घोटाळा?

खासगी शिकवण्या आणि शाळांच्या संगनमताने नियम डावलून अंबरनाथ, बदलापूरमधील विद्यार्थ्यांना औरंगाबादमधील शाळेतून दहावीला बसवण्याचा गैरप्रकार यातून समोर येत आहे. मुलांना उत्तीर्ण करण्यासाठी यापूर्वी असाच प्रकार आरोपीने अनेकदा केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मोठय़ा घोटाळ्याचे बिंग फुटण्याची शक्यता आहे.

अन्य शिक्षक अटकेत

अंबरनाथ येथील विस्डम क्लासेस चालवणाऱ्या मुनीर शेख या शिक्षकाला अंबोली पोलिसांनी गुरूवारी रात्री अटक केली. मुख्य आरोपी फिरोजने प्रश्नपत्रिका फोडून त्या औरंगाबाद येथे थांबलेल्या आतीषला पाठवल्या. तर आतीषने या प्रश्नपत्रिका मुनीरला धाडल्या. मुनीरकडे दहावीचे साधारण ४० विद्यार्थी शिकत होते. शिवाय विस्डम क्लासेसच्या शाखा अंबरनाथ, बदलापूरपासून कल्याण, ठाणे, भांडुप, सॅण्डहर्स्ट रोड, सीएसएमटी या भागातही आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2018 2:24 am

Web Title: ssc question paper leak
Next Stories
1 पारंपरिक मीठ व्यवसायाला तरुण पिढी जागेना!
2 नागपूरचे भाजप कार्यकर्ते सुरतमार्गे मुंबईत
3 शिवसेनेपुढे भाजपचे नमोनम:
Just Now!
X