News Flash

एसटी प्रवास महागणार!

डिझेलवरील कर माफ केल्यास भाडेवाढीचा फेरविचार

संग्रहित प्रतिनिधिक छायाचित्र

तिकीट दरात १८ टक्के वाढ; अंमलबजावणी १५ जूनपासून; डिझेलवरील कर माफ केल्यास भाडेवाढीचा फेरविचार

वाढते इंधन दर, कामगारांची वेतनवाढ यामुळे एसटीवर मोठा आर्थिक बोजा पडत असल्याचे सांगत तिकीट दरांत १८ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १५ जूनपासून नवे तिकीट दर लागू होतील, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली. यामुळे दादर ते स्वारगेट वातानुकूलित शिवनेरीचे अंदाजित भाडे ४५६ रुपयांवरून ५४० रुपयांवर तर मुंबई ते रत्नागिरी साध्या बसचे भाडे ३९२ रुपयांवरून ४६५ रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळाकडून नवीन भाडेदराबाबतची सविस्तर माहिती येत्या दोन ते तीन दिवसांत दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

एसटी महामंडळाने नुकतीच कामगारांसाठी ४, ८४९ कोटी रुपयांच्या सुधारित वेतनकराराची घोषणा केली. यामुळे एसटीवर प्रत्येक वर्षी १,२०० कोटीहून अधिक बोजा पडणार आहे. त्यातच इंधनाच्या दरवाढीमुळे दरवर्षी साधारण ४६० कोटी रुपयांचाही खर्च वाढला आहे. वाढीव खर्चामुळे एसटीकडून ३० टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. हा प्रस्ताव परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष दिवाकर रावते यांच्याकडे मंजुरीसाठी होता. मात्र सामान्य प्रवाशांचा विचार करता कमी भाडेवाढ करण्याचे संकेत रावते यांनी दिले होते. अखेर एसटीच्या तिकीट दरांत १८ टक्के वाढ करण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी १५ जूनपासून केली जाणार असल्याचे सांगितले.  राज्य शासनाकडे डिझेलवरील विविध कर माफ करावेत, अशी मागणी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. या मागणीला मुख्यमंत्र्यांसह वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ही मागणी मान्य झाल्यास तिकिट दरवाढीचा फेरविचार करण्यात येईल, असे रावते यांनी स्पष्ट केले.

तिकीटाची भाडे आकारणी पाच रुपयाच्या पटीने करण्यात येणार आहे. एखाद्या प्रवासाचे तिकीट सात रुपये असेल तर त्याऐवजी पाच रुपये आकारले जातील. जर आठ रुपये असतील तर दहा रुपये तिकीट आकारले जाणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले. प्रवासी आणि वाहकात सुट्टय़ा पैशांमुळे होणारे वाद यामुळे थांबतील, असेही स्पष्ट करण्यात आले. दादर-स्वारगेट वातानुकूलित शिवनेरी बसचे भाडे ४५६ रुपयांवरुन ५४० रुपये तर दादर ते पुणे स्टेशन औंधमार्गे शिवनेरीचे ४४१ रुपये भाडे ५२० रुपये होण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2018 12:35 am

Web Title: st bus service
Next Stories
1 ‘एल्गार’ आयोजकासह चौघे अटकेत भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरण
2 साखर उद्योगाला साडेआठ हजार कोटींची संजीवनी
3 अमित शाह – उद्धव ठाकरेंमधील भेट सकारात्मक, येणाऱ्या दिवसांत अजून २ ते ३ बैठका होण्याची शक्यता
Just Now!
X