एसटीच्या बस गाडीवर चिकटवण्यात आलेल्या या स्टिकर्सवरील छायाचित्र पाहून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित ही जाहिरात केल्याचे वाटत असले तरी ही जाहिरात बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त नसून ही जाहिरात कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित साजऱ्या होणाऱ्या ‘मराठी राजभाषा दिना’ची आहे. ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा’च्या इतिहासात पहिल्यादाच कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी मराठी राजभाषा दिनाचा ‘गौरव’ होत आहे. हे स्वागतार्ह असले तरी एसटीच्या स्टिकर्सवर बाळासाहेब यांचे छायाचित्र प्रसिद्ध करून मराठी भाषा दिनाला राजकीय रंग देण्यात येत असल्याचा आरोप केला जात आहे.

आर्थिक तोटय़ात धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या आजवरच्या इतिहासात कधी नव्हे तो मराठी भाषा दिन साजरा केला जात आहे. महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या पुढाकाराने मराठी भाषा दिन साजरा होत असला तरी सरकारी जाहिरातींवर बाळासाहेबांचे छायाचित्र झळकत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर कुसुमाग्रजांचे छायाचित्र नावापुरते असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे.

आज, २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिनानिमित्त मराठीतील श्रेष्ठ कवींच्या कवितांतील निवडक ओळी पत्रकस्वरूपात प्रत्येक बस गाडीत चिकटवण्यात येणार असल्याचे एसटी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. मात्र ‘कवितां’च्या स्टिकर्सपेक्षा बाळासाहेबांची छायाचित्रे दिसत आहेत. एसटी महामंडळाच्या ताफ्यातील १८ हजारांहून अधिक बस गाडय़ांत, तर ५६८ बस स्थानकांत कविवर्य कुसुमाग्रजांसह वि. म. कुलकर्णी, सुरेश भट आणि फादर स्टिफन्स यांनी रचलेल्या कविता प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

मात्र प्रत्यक्षात ही अंमलबजावणी झालेली नसल्याचे पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रातील सबंध मराठी माणसाचे शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे श्रद्घास्थान आहे. ज्या मराठी माणसासाठी बाळासाहेबांनी संघर्ष केला. त्याचे छायाचित्र मराठी भाषादिनानिमित एसटीच्या जाहिरातीत असणे, यात गैर काहीच नाही. त्यात राजकीय रंग अजिबात नाही. असता तर जाहिरांतीवर शिवसेना पक्षाचा उल्लेख असता. मात्र तसे नाही. आणि आजवर इतर मोठय़ा नेत्यांचाही सरकारी जाहिरातीवर छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे.

-दिवाकर रावते, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ