मुंबई : गणेशोत्सवानिमित्त एसटी महामंडळाकडून कोकणासाठी २,२०० गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. या गाडय़ांचे आरक्षण १६ जुलैपासून सुरू होत असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली.

मुंबई, ठाणे, पालघरमधून कोकणसाठी ४ सप्टेंबरपासून गाडय़ा सुटतील. परंतु करोना साथीच्या तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त होत आहे. तिसरी लाट आलीच तर  कोकणात जाण्यासाठी विलगीकरणाचा कालावधी असेल की नाही याबाबत अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे या गाडय़ांच्या आरक्षणाला आतापासून प्रतिसाद मिळेल की नाही अशी शंकाही आहे. गणेशोत्सव  १० सप्टेंबरपासून सुरू होणारआहे.

एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवासाठी ४ सप्टेंबर ते १० सप्टेंबर २०२१ दरम्यान जादा गाडय़ांचा प्रवास सुरू राहील. तर १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान या गाडय़ा कोकणातून परतीच्या प्रवासाला लागतील. १६ जुलै २०२१ पासून आरक्षणाला सुरुवात होणार असून चाकरमान्यांना परतीच्या प्रवासाचे म्हणजेच एकाच वेळी आरक्षण करता येणार आहे. प्रवासापूर्वी सर्व बसेस निर्जंतूक केल्या जाणार असून प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांना मुखपट्टीचा वापर बंधनकारक आहे. गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरुपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार असल्याचे महामंडळाने सांगितले.

८०० बस समूहांसाठी..

२,२०० जादा गाडय़ांमध्ये ८०० गाडय़ा समूह आरक्षणासाठी उपलब्ध के ल्या आहेत. समूह आरक्षणाच्या तारखा वेगवेगळ्या असून एसटी महामंडळाकडून त्या लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. ऊर्वरित जादा गाडय़ांचे आरक्षण मात्र १६ जुलैपासून सुरू होईल.

..तर संपूर्ण भाडेपरतावा

करोनामुळे निर्बंध लागू झाले आणि त्या कारणाने प्रवाशाने तिकीट रद्द के ल्यावर त्याचा संपूर्ण परतावा देण्यात येईल, अशी माहिती एसटी महामंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. गेल्या वर्षी १० दिवस विलगीकरण तसेच करोना चाचणी असे निर्बंध घातले होते.