उत्पन्नवाढीसाठी १ मार्च ते ३० एप्रिलपर्यंत ‘प्रवासी वाढवा अभियान’

मुंबई : एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसून प्रवासी आणि उत्पन्नवाढीसाठी विशेष अभियान राबवण्याची आत्यंतिक निकड निर्माण झाल्याचे नुकतेच महामंडळाने काढलेल्या परिपत्रकातून स्पष्ट केले आहे. त्यामुळे १ मार्च ते ३० एप्रिलपर्यंत एसटी महामंडळ ‘प्रवासी वाढवा अभियान’ हाती घेणार आहे. या कालावधीत किमान दोन टक्के भारमान वाढवण्याचे उद्दिष्ट देताना कारवाईचा इशाराही महामंडळाने अधिकारी आणि चालक-वाहकांना दिला आहे.

खासगी ट्रॅव्हल्सने निर्माण केलेली स्पर्धा, एसटीचे वाढत जाणारे भाडे, अस्वच्छ गाडय़ा, आगार आणि स्थानकातील गैरसोयी इत्यादींमुळे गेल्या काही वर्षांत एसटीची प्रवासी संख्या बरीच घटली. परिणामी उत्पन्न कमी होत गेले. त्यामुळे तोटाही वाढत गेल्याने कर्मचाऱ्यांना वेतन देणेही कठीण झाले. या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी अधिकाऱ्यांसोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत प्रवासी व उत्पन्नवाढीचे उद्दिष्ट दिले. त्यानंतर २१ फेब्रुवारीला या संदर्भातील परिपत्रकच जारी केले आहे.

परिपत्रकानुसार एसटीच्या प्रवासी भारमानात गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने घसरण होत आहे. मार्च २०१९ मध्ये प्रवासी भारमान ६४.७१ होते. मार्च २०२० मध्ये हेच उद्दिष्ट ६६.७१ टक्के देण्यात आले आहे. यात प्रवासी आणि उत्पन्नवाढ करणाऱ्या आगारांची निवड करून यामधील तीन आगारांना रोख पारितोषिक आणि स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे. उद्दिष्टापेक्षा सर्वात जास्त व सर्वात कमी उत्पन्न आणणाऱ्या तीन चालक आणि वाहक यांची नावे आगारातील फलकावर नमूद केली जाणार आहेत. तसेच प्रवासी व उत्पन्न वाढवण्यात अपयशी ठरल्यास संबंधित अधिकारी, पर्यवेक्षकांची गैरसोयीच्या ठिकाणी बदली करण्याचा इशाराही परिपत्रकातून दिला आहे.

अभियानातील महत्त्वाचे मुद्दे

’ गर्दीच्या ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी किमान दोन तास प्रवाशांना चढ-उतार करण्यासाठी पर्यवेक्षक व कर्मचाऱ्यांनी मदत करावी.

’ ज्या ठिकाणी थांबे देण्यात आले नाहीत, मात्र प्रवासी उपलब्ध आहेत असे प्रवासीही बसमध्ये घेऊन जाणे.

’ विभागीय कार्यालयातील अधिकारी वेळोवेळी आगार आणि स्थानकात भेट देतील.

’ मार्ग तपासणी पथकाद्वारेही बसगाडय़ांमध्ये प्रवासी चढणे किंवा उतरतात का याची पाहणी करतील.