‘गळकी गाडी दाखवा, १०० रुपये मिळवा’, असा प्रस्ताव एसटी महामंडळाच्या बुधवारच्या बैठकीत चर्चेसाठी येणार आहे. मात्र एसटी महामंडळाच्या ताफ्यातील बहुतांश गाडय़ा जुनाट आणि गळक्या असल्याने हा प्रस्ताव महामंडळाच्याच अंगलटी येण्याची शक्यता आहे. प्रवाशांना देण्यात येणारे १०० रुपये हे एसटीच्या सामान्य कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापणार असल्याने एसटी कामगार संघटनेने या प्रस्तावातील वसुलीच्या भागाला कडाडून विरोध केला आहे.
एसटी महामंडळाची प्रवासी संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल तीन टक्क्यांनी कमी झाली. वर्षभरात एसटीला पाच कोटी प्रवाशांना मुकावे लागले. त्यामुळे प्रवाशांना आकृष्ट करण्यासाठी एसटीने येत्या पावसाळी हंगामात ‘गळकी गाडी दाखवा, १०० रुपये मिळवा’ अशी योजना जाहीर करण्याचे ठरवले आहे. बुधवारी एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयात याबाबत बैठक होणार असून या बैठकीत हा प्रस्ताव चर्चेला येण्याची शक्यता आहे.
एसटीच्या ताफ्यातील १७ हजार गाडय़ांपैकी बहुतांश गाडय़ा जुनाट आणि गळक्या आहेत. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर झाल्यास प्रवाशांची पर्वणी आणि एसटीच्या आर्थिक स्थितीचे धिंडवडे निघणार आहेत. तसेच प्रवाशांना देण्यात येणारे १०० रुपये हे आगारातील आणि कार्यशाळेतील कर्मचारी, पर्यवेक्षक, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक, वाहन परीक्षक यांच्या पगारातून कापूत घेतले जाणार आहेत. त्याशिवाय आगार व्यवस्थापकाच्या पगारातूनही ३५ टक्के रक्कम कापली जाणार आहे.
कर्मचाऱ्यांच्या पगारातून होणाऱ्या या वसुलीला मान्यताप्राप्त कामगार संघटनेने कडाडून विरोध केला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयात गाडी मान्यतेसाठी नेताना त्या गाडीवर तीन दिवस काम होणे अपेक्षित असते. मात्र त्याऐवजी यंत्र अभियंता एका दिवसातच गाडीचे काम करून ती परवान्यासाठी पाठवतो. यामुळे गाडी गळत असल्यास त्याचा ठपका कामगारांवर का, असा प्रश्नही कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

pune mahametro marathi news, metro station name change pune marathi news
पुणे मेट्रोच्या स्थानकांचे आता नामांतर! जाणून घ्या कोणत्या स्थानकांची नावे बदलणार…
Pimpri-Chinchwad mnc
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा वादग्रस्त निर्णय : एका बँकेत ९८४ कोटी अडकल्यानंतरही ठेवी पुन्हा खासगी बँकेत
Pimpri mnc cut trees
धक्कादायक : पिंपरी महापालिका करणार १४२ झाडांची कत्तल, जाणून घ्या काय आहे प्रकरण
maharashtra budget 2024
अर्थसंकल्पात विदर्भाला काय मिळाले? मिहानला १०० कोटी, अन् बरेच काही…