‘एमकेसीएल’च्या भरती प्रक्रियेतून २०१२मध्ये एसटी महामंडळाच्या सेवेत आलेल्या ७२७ चालकांना त्यांच्या मूळ जिल्ह्य़ातील विभागांमध्ये बदली मिळावी, यासाठी या चालकांनी जाहीर केलेले उपोषण आंदोलन मागे घेण्यात आले. एसटी कर्मचारी काँग्रेसच्या मध्यस्थीने एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल यांच्याशी चर्चा केल्यानंतर हे आंदोलन मागे घेतले आहे.

२०१२मध्ये झालेल्या या भरती प्रक्रियेत मुंबई व कोकण विभागातील तब्बल ७२७ चालकांना इतरत्र नेमण्यात आले होते. या चालकांनी सातत्याने आपल्या मूळ जिल्ह्य़ातील विभागांमध्ये बदली मिळावी अशी मागणी महामंडळाकडे केली होती. मात्र त्याला काहीच प्रतिसाद न मिळाल्याने एसटी कर्मचारी काँग्रेसच्या माध्यमातून या चालकांनी आझाद मैदानात उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांच्यासह चालकांच्या प्रातिनिधिक शिष्टमंडळाने बुधवारी एसटीचे उपाध्यक्ष रणजीत सिंह देओल यांच्याशी चर्चा केली.

एसटी अध्यक्ष व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या आदेशानुसार या चालकांची बदली टप्प्याटप्प्याने त्यांच्या मूळ जिल्ह्य़ात करण्यात येणार असल्याचे रणजीत सिंह देओल यांनी या चर्चेदरम्यान स्पष्ट केले. याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर होईल, असे आश्वासन देओल यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी स्पष्ट केले.