एसटी कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळी सण सुकर होण्यासाठी एसटी प्रशासनाने यंदा प्रथमच कर्मचाऱ्यांचे वेतन एक नोव्हेंबर रोजी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांना पगारासोबत वेतन वाढ आणि थकबाकीचे पाच हप्ते देखील मिळणार आहेत. दिवाळी भेट म्हणून एसटी कर्मचाऱ्यांना २,५०० रुपये, तर अधिकाऱ्यांना पाच हजार देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. याशिवाय एसटी अधिकाऱ्यांना १० टक्के इतकी अंतरिम वेतनवाढ, तसेच एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही वाढ केली जाणार आहे.

एसटी अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात राज्य सरकारी अधिकाऱ्यांप्रमाणे ६ टक्के इतकी वाढ जुन्या वेतनानुसार करण्यात आली. ऑक्टोबर २०१८ च्या वेतनापासून हा महागाई भत्ता देण्यात येईल. वेतनवाढीमुळे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन आधीच सुधारित झाले आहे. त्यांच्या महागाई भत्त्यामध्ये केंद्र शासनाप्रमााणे २ टक्के इतकी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

एसटी अधिकाऱ्यांच्या वेतनात त्यांच्या एकूण वेतनाच्या १० टक्के इतकी अंतरिम वाढ करण्यात येणार आहे. ऑक्टोबर २०१८ पासून ही वेतनवाढ लागू होईल. याबाबत अभ्यास करून महामंडळाला शिफारस करण्यासाठी मंत्रालयातील निवृत्त अधिकाऱ्यांची दोन सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.