03 December 2020

News Flash

बेस्टच्या मदतीस आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे हाल कायम

सांगली व सोलापूर विभागांतील १८१ कर्मचाऱ्यांना करोना

(संग्रहित छायाचित्र)

निवास आणि जेवणाच्या व्यवस्थेत त्रुटी; सांगली व सोलापूर विभागांतील १८१ कर्मचाऱ्यांना करोना

मुंबई : मुंबईत बेस्ट उपक्र माच्या मदतीला आलेल्या एसटीच्या चालक, वाहकांसह यांत्रिकी कर्मचाऱ्यांची निवास व जेवणाच्या व्यवस्थेतील त्रुटी आणि करोनापासून बचावासाठी एसटीकडून मिळणाऱ्या आरोग्य साधनांच्या कमतरतेमुळे मोठी गैरसोय होत आहे. सांगली व सोलापूर विभागातून मुंबईत आलेल्या १८१ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे.

सर्वसामान्यांसाठी लोकल नसल्याने बेस्ट उपक्रमाच्या बसगाडय़ांना प्रचंड गर्दी होऊ लागली आणि बेस्टच्या बस अपुऱ्या पडल्याने एसटी महामंडळाच्या बस भाडेतत्त्वावर घेऊन त्या ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय मुंबई पालिका, बेस्टने घेतला. त्यानुसार एक हजार बस अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, धुळे, बीड, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी विभागांतून मागवण्यात आल्या आहेत. तर याच विभागातून चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारीही दाखल होतात. कामाचे १० ते १५ दिवस भरल्यानंतर येथील कर्मचारी आपल्या विभागात जातात आणि त्याऐवजी तेवढय़ाच संख्येने बदली कर्मचारी येतात.

या कर्मचाऱ्यांच्या निवास व जेवणाच्या व्यवस्थेची जबाबदारी महामंडळाने खासगी पुरवठादारावर सोपवली आहे. मात्र ही व्यवस्था नीट नसल्याने गैरसोय होत असून रस्त्यावरच रात्र काढावी लागते. मालाडमधील हॉटेल रॉयल पाम येथे राहत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या जेवणात अळ्या सापडल्याची घटना रविवारी घडली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला. कर्मचाऱ्यांना निकृष्ट दर्जाचेही जेवण उपलब्ध केले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र एस.टी.वर्कर्स काँग्रेसने (इंटक) केला आहे. याशिवाय उत्कृष्ट दर्जाचे सॅनिटायझर, मास्क, हॅण्डग्लोव्ह्जही मिळत नाही. कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडेही दुर्लक्ष होत असल्याने मुंबईत कार्यरत राहून परतलेल्या सांगली विभागातील १०० हून अधिक आणि सोलापूर विभागातील ८१ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे इंटकचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी सांगितले. यावर तोडगा निघाला नाही, तर आंदोलनाचा इशाराही तिगोटे यांनी दिला.

कुर्ला आगारात आंदोलन

बेस्टच्या मदतीला मुंबईबाहेरून आलेल्या एसटीच्या चालक-वाहकांसह अन्य कर्मचाऱ्यांनी सोमवारी दुपारी कु र्ला आगारात आंदोलन के ले. निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याची तक्रोर करून गाडी चालवण्यास नकार दिला. त्यामुळे काही वेळ बेस्टच्या मदतीला जाणाऱ्या एसटी निघू शकल्या नाहीत. परिणामी प्रवाशांची गैरसोय झाली. ही समस्या सोडवण्याचे आश्वासन एसटी आगार प्रमुखांकडून दिल्यानंतर एसटीची सेवा पूर्ववत झाल्याचे बेस्ट उपक्र माच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.

मालाड येथे राहत असलेल्या  कर्मचाऱ्यांच्या रविवारी रात्रीच्या जेवणामध्ये अळ्या असल्याचे संबंधित कर्मचाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यांना तातडीने दुसरे जेवण पुरवले. यापुढे असे प्रकार घडणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित जेवण पुरवणाऱ्या कंपनीला दिल्या आहेत. या प्रकरणी चौकशी करण्यात येत असून, कर्मचारी राहत असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

– अभिजीत भोसले, जनसंपर्क अधिकारी, एसटी महामंडळ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 12:58 am

Web Title: st employees who came to help best suffer with covid 19 positive zws 70
Next Stories
1 मेट्रो कारशेडवरून केंद्र-राज्य संघर्ष
2 वरळी कोळीवाडा झोपडपट्टी घोषित करण्याबाबतची सुनावणी तूर्त रद्द!
3 ‘मराठा आरक्षण : घटनापीठ स्थापण्याबाबत लवकरच निर्णय’
Just Now!
X