डिझेल दरवाढीमुळे राज्य परिवहन महामंडळाला प्रचंड नुकसान होत असल्याने एसटीच्या प्रवासभाडय़ात वाढ करण्याचा निर्णय राज्य परिवहन प्राधिकरणाने घेतला आहे.
येत्या २ जुलैपासून ही दरवाढ लागू होणार असून साध्या किंवा जलद सेवेच्या पहिल्या २४ कि.मी.च्या प्रवासासाठी १ रुपया, तर पुढच्या २५ ते ३० कि.मी. प्रवासासाठी २ रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.
राज्य सरकारने ‘आपोआप भाडेवाढ सूत्र’ मंजूर केल्याने सततची होणारी डिझेल दरवाढ, टायर तसेच महागाई भत्त्यात झालेली वाढ, याचा मोठा फटका परिवहन मंडळाला बसल्याचे प्राधिकरणाचे म्हणणे आहे.
याआधी १२ सप्टेंबर २०१२ मध्ये प्रवासी भाडय़ात वाढ करण्यात आली होती. त्यामुळे लगेचच भाडेवाढ टाळण्यात आली होती. मात्र, परिवहन मंडळाचे होणारे नुकसान रोखण्यासाठी प्रवासी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेणे अपरिहार्य ठरल्याचे राज्य परिवहन प्राधिकरणाचे म्हणणे आहे.
ग्रामीण भाग एसटीवर अवलंबून असल्याने दरवाढीत त्यांच्यावर कमी भार पडेल, याची काळजी घेण्यात आल्याचेही प्राधिकरणाने म्हटले आहे.
एसटीच्या नव्या दरवाढीनुसार सध्या एसटीच्या प्रति कि.मी. प्रवासामागे ५ ते ६ रुपये, रात्रीच्या एसटीसेवेसाठी प्रति कि.मी. ७ ते ८ रुपये, निमआराम प्रवासासाठी प्रति कि.मी. १० रुपये, वातानुकूलित प्रवासासाठी २० रुपये, तर शिवनेरीच्या वातानुकूलित प्रवासासाठी प्रति कि.मी. २२ ते २३ रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. त्यामुळे या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसेल.
राज्य परिवहन मंडळाने केलेल्या या दरवाढीनुसार आता पुणे-मुंबई या शिवनेरीच्या प्रवासासाठी ३९० रुपये मोजावे लागणार आहेत. शिवनेरीतून प्रवास करण्यासाठी बोरिवली ते स्वारगेटसाठी ४६५ रुपये, पुणे-औरंगाबाद, पुणे-कोल्हापूर आणि पुणे- सांगली प्रवासासाठी ५७३ रुपये, पुणे-नाशिकसाठी ५२९ रुपये, तर पुणे-नाशिक निमआराम वातानुकूलित प्रवासासाठीही ३८९ रुपये मोजावे लागणार आहेत.