पुणे-मुंबई-ठाणे या दरम्यान धावणाऱ्या हजारो गाडय़ांच्या अनधिकृत फुड मॉल थांब्यांमुळे प्रवासी वर्गात प्रचंड नाराजी आहे. या नाराजीची दखल ‘लोकसत्ता’ने बातम्यांमार्फत वारंवार घेतल्यानंतर आता एसटी महामंडळानेही याबाबत ठोस उपाययोजना केली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील फुड मॉल चालकांकडून एसटीने निविदा मागवल्या असून त्यातून चार फुड मॉलची निवड जवळपास निश्चित झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत द्रुतगती महामार्गावरील आरामदायक प्रवास सोडून लोणावळ्यातील अत्यंत अस्वच्छ फुड मॉलवर थांबणाऱ्या बसगाडय़ांना चाप बसणार आहे.
पुण्याहून मुंबईला निघालेली शिवनेरी तासाभरात लोणावळ्यात पोहोचते आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर उतरून ‘एनएच-४’ आणि ‘सेंटर पॉइंट’ या अत्यंत अस्वच्छ फुड मॉलवर थांबते.
एसटीचे वाहक-चालक आणि फुड मॉल मालक यांचे परस्पर ‘अर्थ’पूर्ण संबंध असल्याचेही अनेकदा समोर आले आहे. मात्र याबाबत एसटी प्रशासनाने वारंवार उदासीनता दाखवली होती.
या मार्गावर दोन्ही बाजूंनी दिवसभरात एसटीच्या हजाराच्या वर फेऱ्या होतात. सध्या एसटीने काढलेल्या निविदेत एका शिवनेरीच्या थांब्यामागे १६० रुपये फुड मॉल चालकांनी एसटीला द्यावेत, असे नमूद केले आहे. शिवनेरीच्या २५० फेऱ्या दिवसभरात होत असल्याने ही रक्कम एका दिवसाला ४० हजार एवढी होते. त्याशिवाय साध्या बसगाडय़ांसाठी ही रक्कम १०० ते ११० रुपयांच्या आसपास आहे. साध्या बसगाडय़ांच्या १००० फेऱ्या दिवसाला धरल्या, तर ही रक्कम दर दिवशी एक लाखाच्या आसपास जाते. त्यामुळे एसटीला प्रतिदिन दीड लाखाच्या आसपास उत्पन्न मिळेल. ही निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून प्रशासनासमोर पुण्याहून मुंबईला येणाऱ्या दोन आणि मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या दोन अशा चार फुड मॉल चालकांचे प्रस्ताव विचाराधीन असल्याचे एसटीच्या वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक कॅ. विनोद रत्नपारखी यांनी सांगितले. आठवडाभरात एसटीच्या गाडय़ा या चार फुड मॉलवर थांबवल्या जातील. त्या तशा न थांबल्यास प्रवाशांनी एसटीच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी, असेही त्यांनी
स्पष्ट केले.
मुंबई-ठाणे-पुणे मार्गावरील फुड मॉल थांब्यांबाबत निश्चित धोरण झाल्यानंतर आता राज्यभरातील इतर धाब्यांबाबतही एसटी लवकरच धोरण ठरवणार आहे. तेथेही निविदा प्रक्रियेने कंत्राट दिले जाणार असून प्रवाशांना उत्तम सुविधा मिळतील, अशाच ठिकाणी एसटीला अल्पोपाहार थांबा दिला जाईल.
– कॅ. विनोद रत्नपारखी (महाव्यवस्थापक, वाहतूक)