संदीप आचार्य

करोनाचा सामना करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने कठोर पावले उचलली असून जे जे रुग्णालयाच्या अखत्यारीतील सेंट जॉर्ज आणि जीटी रुग्णालय संपूर्ण रिकामे करून तेथे आता केवळ करोना रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत.

एकीकडे मुंबई महापालिका आणि आरोग्य विभाग करोनाच्या लढाईसाठी सज्ज झाला असताना करोनाचे रुग्ण वाढू शकतात हे लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षण विभागाने सेंट जॉर्ज आणि जीटी रुग्णालय संपूर्णपणे रिकामे करण्याचे काम हाती घेतले आहे. या दोन्ही रुग्णालयातील रुग्णांना जेजे रुग्णालयात हलविण्यात येणार असून संपूर्ण रुग्णालयात यापुढे केवळ करोनाशी संबंधित रुग्णांवर उपचार केले जातील असे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ तात्याराव लहाने यांनी सांगितले.   होम क्वारंटीन केलेले रुग्ण घरातून  बाहेर जात असल्याची प्रकरणे उघडकीस येत असून मुंबईत करोना बाधितांची संख्या वाढू शकते हे लक्षात घेऊन सेंट जॉर्ज व जीटी रुग्णालयात फक्त करोना रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. याशिवाय पुण्यातील बीजे रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या ११ मजली नव्या इमारतीत करोना साठी ६०० विलगीकरण खाटा व १०० अतिदक्षता विभागात खाटांची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच शासनाच्या नागपूर येथील  दोन वैद्यकीय महाविद्यालय ३०० विलगीकरण खाटा व ५० बेड अतिदक्षता विभागासाठी तयार ठेवले जाणार आहेत.

होणार काय?

या दोन्ही रुग्णालयात ५५० विलगीकरण खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे तर व्हेंटिलेटरची व्यवस्था असलेले १०० अतिदक्षता बेड असतील. यात सेट जॉर्ज रुग्णालयात ३०० विलगीकरण खाटा तर ७० बेड अतिदक्षता विभागात असतील. जीटी रुग्णालयात २५० विलगीकरण खाटा असून ३० बेड अतिदक्षता विभागासाठी राखीव असतील. या दोन्ही रुग्णालयात करोना रुग्णांसाठी स्वतंत्र बाह्य़रुग्ण विभाग तयार करण्यात येणार असून यासाठी पावणे सात कोटी रुपये खर्च केला जाणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ तात्याराव लहाने यांनी सांगितले.