20 February 2019

News Flash

आरोग्य संचालनालयास वाळवीचा विळखा!

आठही मजल्यांवरील अधिकारी हैराण; काम करणे अवघड

( संग्रहीत छायाचित्र )

|| संदीप आचार्य

आठही मजल्यांवरील अधिकारी हैराण; काम करणे अवघड

संपूर्ण राज्याचा कारभार ज्या सेंट जॉर्ज रुग्णालयातील ‘आरोग्य संचालनालया’तून चालतो ती संपूर्ण आठ मजली इमारत वाळवीच्या विळख्यात सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आरोग्य संचालनालयात गेली अनेक वर्षे वाळवी असून दर वर्षी त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून औषधफवारणी केली जाते. मात्र लाखो रुपये खर्च करून केलेल्या औषधफवारणीनेही वाळवी नष्ट होत नसल्याचा येथील अधिकाऱ्यांचा आरोप आहे.

यंदा या वाळवीचा डोंगर आठही मजल्यांमध्ये पसरला असून येथील डॉक्टरांना काम करणे अवघड होऊन बसले आहे.  आपल्याच दालनात संपूर्ण कपाटावर पसरलेली ही वाळवी पाहून क्रोधित झालेले आरोग्य संचालक डॉ. संजीव कांबळे यांनी तात्काळ वाळवी नष्ट करण्यासाठी काय कारवाई करणार, असा सवाल गुरुवारी संबंधित अधिकाऱ्याला बोलावून विचारला.

आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगून वाळवी नष्ट करण्यासाठी औषधफवारणी करण्यास सांगतो. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून औषधफवारणी केली जाते, असे संचालकांनी बोलावलेल्या अधिकाऱ्याने सांगितले तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभाग वाळवी नष्ट करण्यासाठी औषधफवारणी करते की वाळवी पसरविण्यासाठी, असा सवाल तेथे उपस्थित असलेल्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने केला.

आरोग्य संचालकांच्या दालनाशेजारी असलेल्या त्यांच्या कार्यालयातील कपाटांमध्येही वाळवी दिसत आहे. वाळवी कुठे आहे यापेक्षा वाळवी कुठे नाही, असा खरा प्रश्न तुम्ही विचारा, असेही येथील अनेक अधिकाऱ्यांनी सांगितले.

यंदा वाळवी नष्ट करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला तीन लाख रुपये देण्यात आल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. वाळवी नष्ट करण्याचे काम या विभागाकडून करण्यात येत असून तीन मजल्यांचे काम झाले आहे. मात्र यासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधाचा वास खूप तीव्र असल्यामुळे आठवडाअखेरीस सुटीच्या दिवशी एकेका मजल्याचे काम केले जात असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने आरोग्य संचालकांना सांगितले. अखेर येत्या शनिवार व रविवारी आरोग्य संचालकांच्या दालनात वाळवी नष्ट करण्याची कारवाई केली जाईल व या दिवशी आपण कार्यालयात येऊ नये असे सांगून त्यांच्या दालनातून बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने काढता पाय घेतला.

अधिकारी हतबल..

संपूर्ण इमारतीला आतून व बाहेरून वाळवी नष्ट करण्यासाठी औषध वापरण्याची आवश्यकता आहे, त्याचप्रमाणे इमारतीच्या पायामध्येही वाळवी रोखण्यासाठी औषधयोजना करण्याची गरज असताना कोणत्याही शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याबाबत कारवाई होत नसल्याचेही येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे. आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला कारवाईसाठी कळवण्यापलीकडे काहीही करू शकत नाही, या शब्दांत येथील अधिकाऱ्यांनी आपली हतबलता व्यक्त केली.

परिस्थिती काय?

आरोग्य संचालनालयाच्या प्रत्येक मजल्यावर वाळवी पसरली असून अनेक कपाटे, दरवाजे तसेच भिंतींवर ती नांदत आहे. येथे असणाऱ्या नोंदी, कागदपत्रे आणि महत्त्वाचे कागद, दस्तावेज या वाळवीपासून कसे वाचवायचे, असा प्रश्न येथील डॉक्टरांना सध्या पडला आहे.

First Published on October 12, 2018 2:11 am

Web Title: st george hospital in bad condition