करोनाबाधितांना हाताळण्याचे प्रशिक्षण नाही; सुरक्षेसाठी साधने नसल्याची तक्रार

मुंबई : करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात राज्य सरकारने विशेष व्यवस्था उभारली असली तरी नियोजनाच्या अभावामुळे येथील कर्मचाऱ्यांना करोनासंसर्गाची धास्ती वाटू

लागली आहे. परिचारिका आणि चतुर्थश्रेणी कामगारांना करोनाबाधित रुग्णांना हाताळण्याबाबत प्रशिक्षणच दिले गेले नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला असून कर्मचाऱ्यांना बाधा झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न रुग्णालय प्रशासनाला केला आहे.

दोन दिवसांपूर्वी सेंट जॉर्ज रुग्णालयात एक रुग्ण करोनाची लक्षणे असल्याने दाखल झाला. त्याचा रविवारी रात्री मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा चाचणी अहवाल आल्यावर तो करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. जबाबदारी निश्चित न केल्याने हा मृतदेह कोण हाताळणार यावरून डॉक्टरांमध्ये तासभर वाद झाले. त्यानंतर परिचारिकेसोबत चार कर्मचाऱ्यांनी मृतदेहाचे निर्जंतुकीकरण करून काम बंद केले.

संसर्ग प्रसार होऊ नये म्हणून पीपीई घालावे कसे काढावे याबाबत नियमावली आहे. त्यानंतरही आंघोळ करण्यापासून कपडे बदलण्यापर्यंतचे नियमही आहेत. परंतु इथल्या चतुर्थ श्रेणी कामगारांना याचे प्रशिक्षण दिले गेले नसल्याने कसेही ‘पीपीई’ हाताळत आहेत. त्यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका अधिक आहे. परंतु याच्याशी रुग्णालय प्रशासनाला काहीही घेणे नाही, असे रुग्णालयातील परिचारिकांनी व्यक्त केले.

अचानक अशी घटना घडल्यानंतर बदलण्यासाठी राखीव कपडे रुग्णालयात उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्या दिवशी एका कामगाराला ओल्या कपडय़ानिशी घरी जाण्याची वेळ आली. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांना नर्सिग होममध्ये राहण्याची सुविधा करण्याचे कागदावर नमूद केले आहे. परंतु प्रत्यक्षात खोल्या दिल्या जात नाहीत.

घरामध्ये संसर्ग पसरू नये म्हणून या कर्मचाऱ्यांनी अलग राहणे गरजेचे आहे. मात्र याची काळजी प्रशासन तर घेतच नाही. परंतु त्याबाबत माहितीही कर्मचाऱ्यांना देत नाही. डॉक्टर रुग्णांच्या खोलीबाहेरून आदेश देतात. खोलीत धोका नाही असे सांगून आम्हाला त्यात ढकलणारे स्वत: आत का येत नाहीत, असे विचारत परिचारिकांनी आम्ही आमच्या जिवाशी का खेळायचं असा प्रश्न उपस्थित केला आहे.

सेवा देण्यासाठी नकार नाही

आम्ही आठ तासांहूनही अधिक काळ सेवा देण्यास तयार आहोत, परंतु तशा सुविधा आम्हाला द्या. वेळेवर जेवण, राहण्याची सोय आणि सुरक्षा साधने एवढीच आमची मागणी असल्याचे परिचारिकांनी व्यक्त केले. यासंबंधी रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. तर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी यासंबंधी रुग्णालय प्रशासनाशी बोलावे असे सुचवले.