उमाकांत देशपांडे

करोनामुळे निधन झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांची संख्या दररोज वाढत असल्याने त्यांच्या वारसांना ५० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यासाठी आता राज्य आपत्कालीन निधीतून मदत देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. एसटीकडे निधीची चणचण असल्याने आणि सानुग्रह अनुदान योजनेची मुदत संपल्याने परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सूचनेनुसार शासनाकडे एक-दोन दिवसांमध्ये याबाबत प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.

एसटीच्या १४५ कर्मचाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू होऊनही केवळ ११ कर्मचाऱ्यांना मदत मिळाल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने सोमवारच्या अंकात प्रसिद्ध केले होते. परिवहन मंत्री परब यांनी त्याची तातडीने दखल घेऊन निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना कशी मदत देता येईल, याचे पर्याय तपासण्याचे निर्देश दिले आहेत.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा (फ्रंटलाइन वर्कर्स) करोनामुळे मृत्यू झाल्यास ५० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान वारसांना देण्याची योजना सुरू केली होती व ती एसटीनेही लागू केली होती. मात्र योजनेची मुदत ३१ डिसेंबर २०२० रोजी संपली. अटींमुळे अनेक कर्मचारी मदतीसाठी अपात्र ठरले आणि आणि १ जानेवारीनंतर अनेक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. आता मृतांचा आकडा १५० च्यावर गेला असून रोज त्यात भर पडत आहे.

एसटीचे अपघात किंवा अन्य दुर्घटना घडतात. त्यातील प्रवासी व इतरांना मदत देण्यासाठी प्रत्येक तिकिटामागे एक रुपया आकारून त्यातून आपत्कालीन मदतीचा निधी उभारण्यात आला आहे. गेले तीन वर्षे ही योजना सुरू आहे. गेल्या वर्षी करोनामुळे एसटीचे मोठे उत्पन्न बुडाले, तर २०१९ मध्ये व नंतरही अपघात व अन्य कारणांसाठी भरपाई देताना हा निधी बराच खर्च झाला. सध्या फक्त ३५ कोटी रुपये निधी शिल्लक असून एसटीला फारसे उत्पन्न मिळत नसल्याने त्यात वाढ होत नसल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

त्यामुळे आता राज्य आपत्ती निवारण विभागाकडे प्रस्ताव पाठवून निधीची मागणी केली जाणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव एसटीकडून शासनाला एक-दोन दिवसांत पाठविला जाईल.

मात्र आरोग्य व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सानुग्रह अनुदान योजनेची मुदत वाढविलेली नसताना राज्य आपत्ती निवारण विभागाकडून कसा निधी मिळेल आणि एसटीप्रमाणेच अन्य विभागांकडूनही अशी मागणी केल्यास एसटीचा अपवाद कसा करता येईल, याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, असे संबंधितांनी स्पष्ट केले.

आपत्ती व्यवस्थापन खात्याकडे निधी मागण्याचा परिवहन मंत्र्यांचा निर्णय चांगला असून या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.

– श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस</p>