करोनामुळे विदर्भातील काही भागांत निर्बंध घालण्यात आले आहेत. आता होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्यांवर निर्बंध घालण्यात आल्याने एसटी महामंडळासमोर नवे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

नियमित गाड्यांना कमी प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे  होळीसाठी सोडण्यात येणाऱ्या सुमारे ६०० जादा गाड्यांना प्रतिसाद मिळेल का, या चिंतेत अधिकारी आहेत. राज्यातील काही भागांत तर वाढत जाणारी रुग्णसंख्या व निर्बंधांमुळे गेल्या २० ते २५ दिवसांत एसटीचे जवळपास १०० कोटी रुपये प्रवासी उत्पन्न बुडले आहे.

मुंबई महानगरासह राज्यातील अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, नागपूर, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, पुणे, पिंपरी-चिंचवडसह अन्य काही भागांत रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. परिणामी, राज्य शासनाने विदर्भातील बहुतांश भागांत जमावबंदी, संचारबंदी आदी निर्बंध घातले आहेत.

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबईसह अन्य भागांतून कोणीही कोकणातील गावात येऊ नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे. प्रतिबंधित क्षेत्रातून येणाऱ्यांना ७२ तासांपूर्व करोना अहवाल नकारात्मक (निगेटिव्ह) येणे, प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांना थर्मल स्क्रीनिंग व संशयित आढळल्यास त्याला होळी उत्सवात सहभागी करून घेऊ नये, घरोघरी पालखी नेण्यास मज्जाव  इत्यादी नियमावली तयार करण्यात आली आहे.

त्यामुळे मुंबई, ठाणे, पुणेसह अन्य भागांतून कोकणात जाणारे संभ्रमात पडले आहेत. परिणामी मुंबई, ठाणे, पालघरसह अन्य विभागांतून सोडण्यात येणाऱ्या ६०० जादा व नियमित गाड्यांना प्रतिसाद मिळेल का? या गाड्यांचे आधीच ५० टक्के  आरक्षण झाले आहे. संपूर्ण १०० टक्के  आरक्षण होईल की नाही, असे अनेक प्रश्न समोर असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

करोनापूर्व काळात एसटीतून दररोज ५८ लाख प्रवासी प्रवास करीत होते आणि दररोज २२ कोटी रुपये उत्पन्न मिळत होते. प्रवासी संख्या पुन्हा कमी होऊ लागली आहे.

यासंदर्भात परिवहनमंत्री अनिल परब आणि एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही.

नुकसान का?

करोनाची धास्ती व निर्बंधांमुळे राज्यात एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी होत आहे. एसटीमधून १५ फेब्रुवारी रोजी ३३ लाख प्रवाशांनी प्रवास केला होता. त्या वेळी १६ कोटी रुपये उत्पन्न मिळत होते. २४ फेब्रुवारीला हीच संख्या २६ लाख झाली व उत्पन्न ११ कोटी ८० लाख मिळाले होते. आता हेच उत्पन्न १० कोटी रुपयांपर्यंत आले आहे, तर प्रवासी संख्या थेट २२ लाखांपर्यंत पोहोचली आहे.  त्यामुळे साधारण २५ दिवसांत ११ लाख प्रवासी कमी होऊन १०० कोटी रुपये उत्पन्नही बुडाले आहे.

होळीनिमित्त कोकणात जाणारी मंडळी नव्या नियमावलीमुळे संभ्रमात पडले आहेत. एसटी तसेच रेल्वे गाड्यांचे आधीच आरक्षण केलेले असताना आता ते रद्द करावे का, असा विचारही अनेक जण करत आहेत. कोकणातील गावातील मंडळींशी संपर्क साधून नियमावली कशी राबवली जाणार व प्रवास निर्बंध इत्यादीची माहिती घेत आहोत.  – दीपक चव्हाण, कार्याध्यक्ष, गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघ