राज्यातील मालवाहतुकीचीही विस्कटलेली घडी सावरण्याबरोबरच तोटय़ात चालणाऱ्या एसटीचे उत्पन्न वाढावे यासाठी प्रवासी वाहतुकीची कालमर्यादा संपलेल्या बसचे मालवाहतूक बसमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. पहिली मालवाहतूक बस दोन दिवसांत एसटीच्या ताफ्यात दाखल होईल.

याशिवाय एसटी महामंडळाकडे स्वमालकीचे ३०० ट्रक आहेत. यातून फक्त एसटीच्या साहित्याची ने-आण के ली जाते. यातील २५ ट्रकही मालवाहतूक म्हणून वापरण्याचा निर्णय झाला आहे. एका ट्रकमधून गुरुवारी रत्नागिरी ते मुंबई आंब्याची वाहतूक करण्यात आली.

आर्थिक चणचणीत असलेली एसटी उत्पन्नाचे वेगवेगळे स्रोत शोधत आहे. उत्पन्न वाढीसाठी मालवाहतूक सेवेचा प्रस्ताव एसटी महामंडळाकडे दोन वर्षे प्रलंबित होता. टाळेबंदीमुळे मालवाहतुकीची घडी विस्कटलेली आहे. उद्योगधंदे, फळभाज्या पुरवठय़ाकरिता पुरेशी वाहने, चालक उपलब्ध नाहीत. त्यामुळे एसटीच्या मालवाहतुकीच्या प्रस्तावाला चार दिवसांपूर्वीच शासनाने मंजुरी दिली. यानुसार एका एसटीच्या गाडीत प्रायोगिक तत्त्वावर मालवाहतूक बसप्रमाणे बदल करण्यात येतील. त्यानंतर मालवाहतूक बसची संख्या टप्प्याटप्प्यांत वाढवली जाणार आहे. या बसमधील एक-दोन आसने सोडून उर्वरित काढण्यात येतील. मागील बाजूने माल भरण्यासाठी व उतरवण्याची सोय असेल. बसमधून ९ मेट्रीक टन मालाची वाहतूक होऊ शकते. प्रवासी एसटी बस आठ वर्षे किंवा दहा लाख किलोमीटर धावली की ती भंगारात काढली जाते. वर्षांला अशा साधारण एक ते दीड हजार बसची वयोमर्यादा संपते. परंतु मालवाहतुकीसाठी ती आणखी चार वर्षे वापरता येईल.