28 September 2020

News Flash

दीड वर्ष उलटूनही अत्याधुनिक रुग्णालयाला मुहूर्त नाही!

एसटी महामंडळाचा सावळागोंधळ

एसटी महामंडळाचा सावळागोंधळ

एसटी महामंडळाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी अत्याधुनिक रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला होता आणि तशी घोषणाच जानेवारी २०१६ मध्ये केली. परंतु अद्यापही हे रुग्णालय उभारण्याला मुहूर्त मिळालेला नाही. शासनाची मान्यता यासह कागदपत्रांची पुर्तताच अजूनपर्यंत केली जात आहे. त्यामुळे हे रुग्णालय सुरू होण्यासाठी आणखी किती वर्ष लागणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

परिवहन विभाग आणि एसटी महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने काही योजनांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा एसटीच्या मुंबई सेंट्रल आगारात जानेवारी २०१६ च्या अखेरीस पार पडला होता. त्यावेळी अनेक घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केल्या होत्या. यामध्ये अत्याधुनिक रुग्णालय उभारण्याची घोषणाही करण्यात आली होती. रुग्णालयासाठी जागेचा शोध घेऊन सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली. स्वारगेट आगाराच्या मागे असलेल्या कार्यशाळेच्या जागेत रुग्णालय उभारण्याचे नियोजनही करण्यात आले. १०० खाटांची व्यवस्था असलेले हे रुग्णालय दोन वर्षांत बांधण्याचे उद्दिष्ट एसटीकडून ठेवण्यात आले. पाच कोटींचा अपेक्षित खर्च असलेल्या सुपर स्पेशलिटी रुग्णालयात २५ टक्के खाटा या एसटी कर्मचारी व त्यांच्या नातेवाईकांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. तसेच त्यांना मोफत उपचारही देण्यात येणार आहेत. परंतु, याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे गेल्यावर हे शासनाचे काम असून तुमचे काम फक्त सेवा देणे असल्याचे खडसावले होते. त्यानंतर हे काम पुढे सरकलेच नाही. दीड वर्ष उलटूनही कर्मचारी या रुग्णालयाच्या प्रतिक्षेत आहेत.

यासंदर्भात एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकिय संचालक रणजिंत सिंह देओल यांनी सांगितले की, शासनाकडून काही मंजुरी बाकी होत्या. त्या मंजुरी मिळेपर्यंत काही वेळ गेला. रुग्णालयाच्या कामाला लवकरच मुहूर्त देण्यात येईल.

अभियंता महाविद्यालयाची अंमलबजावणी नाहीच

सुपर स्पेशलिटी रुग्णालयाची घोषणा करतानाच एसटी महामंडळाकडून ऑटोमोबाईल व मॅकेनिकल अभियंता महाविद्यालय उभारण्याचीही घोषणाही करण्यात आली होती. परंतु या घोषणेचीही अंमलबजावणी पूर्ण करण्यात आलेली नाही. यात डिग्री कोर्स सुरु करतानाच २५ टक्के जागा एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. त्यांना मोफत शिक्षण देतानाच ते पूर्ण होताच एसटीत अभियंते म्हणून ५ वर्ष नोकरीचा अनुभवही देण्याचे नियोजन आहे. मात्र हा प्रस्तावदेखिल पुढे सरकलेला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2017 12:30 am

Web Title: st mahamandal technologically advanced hospitals
Next Stories
1 मुंबईचा सागरी किनारा रस्ता ठाण्यापर्यंत
2 कत्तलीची परवानगी नसलेल्या बकऱ्यांची कुर्बानी नाही?
3 पुढील दोन दिवसांमध्ये मुंबई आणि लगतच्या पट्ट्यात अतिवृष्टीचा इशारा
Just Now!
X