१८ ऑक्टोबरपासून बेल्जियमचा अभ्यास दौरा

प्रतिनिधी, मुंबई</strong>

ऐन निवडणुकीच्या तोंडावर एसटी मुख्यालयातील वरिष्ठ अधिकारी १८ ऑक्टोबरपासून नऊ दिवस अभ्यास दौऱ्यासाठी बेल्जियमला रवाना होणार आहेत. हा दौरा देशातील राज्य परिवहन सेवांची शिखर संस्था असलेल्या एएसआरटीयूने (असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग) आयोजित केला आहे. त्याचे अध्यक्ष प्रत्यक्षात एसटीचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल आहेत.

एसटीची प्रवासी संख्या गेल्या दोन वर्षांत चार कोटींनी कमी झाली आहे. तर प्रवासी भारमान हे ५६ टक्क्यांवरून ५४ टक्क्यांवर पोहोचले आहे. अद्यापही त्यात सुधारणा झालेली नाही. त्यात महामंडळातील कर्मचाऱ्यांचे वेतन, सानुग्रह अनुदान, थकबाकी, पथकर, इंधन व टायर खर्च इत्यादीमुळे एसटीचा मोठय़ा प्रमाणात संचित तोटा वाढतच आहे. हा तोटा पाच हजार कोटींपर्यंत पोहोचला आहे.

अशा परिस्थितीत एसटीचे सात वरिष्ठ अधिकारी परदेश दौऱ्यावर जात असल्याने एसटीतील सर्वच कर्मचाऱ्यांकडून टीका होत आहे. १८ ते २६ ऑक्टोबपर्यंत बेल्जियम दौऱ्याचे नियोजन करण्यात आले असून एसटी महामंडळ व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांच्यासह एसटीचे वाहतूक महाव्यवस्थापक, मुख्य वित्तीय लेखाधिकारी, महाव्यवस्थापक (यंत्र) यांसह अन्य विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. २१ ऑक्टोबरला मतदान आणि २४ ऑक्टोबरला मतमोजणी असून आचारसंहिता लागू असल्याने एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परदेशवारी करणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दिवाळीनिमित्त जादा वाहतुकीचे नियोजन करणेही गरजेचे असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा वेळी उपस्थित राहून भारमान वाढवण्यावर भर देणे अपेक्षित आहे. मतदान कर्मचाऱ्यांना घेऊन जाण्यासाठी, मतदान यंत्रांच्या वाहतुकीसाठी राज्यातील सुमारे दोन हजार एसटी बसचा वापर यंदाच्या निवडणुकीत होणार असून त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार हादेखील प्रश्न आहे. या संदर्भात एसटी व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांच्या मोबाइलवर वारंवार संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

एसटी कर्मचाऱ्यांना हक्काचा महागाई भत्ता मिळालेला नसून गेल्या वर्षीप्रमाणे सानुग्रह अनुदानही दिलेले नाही. दिवाळीपूर्वी वेतन देण्याचा निर्णय अद्यापही झालेला नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार असून त्यांना वाऱ्यावर सोडून परदेशवारी करणे कितपत योग्य आहे.

– सदाशिव शिवणकर,  प्रसिद्धी सचिव, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना