खरेदी न केल्याने प्रवासी संख्या वाढण्यात अडचण

मुंबई : शहरी व ग्रामीण भागात सेवा देणारी एसटी १ जून रोजी ७१ व्या वर्षांत पदार्पण करत आहे. मात्र बस आगारांची दुरवस्था, प्रवाशांची कमी होणारी संख्या याबरोबरच आता नवीन गाडय़ांची वानवा अशा समस्यांना एसटीला तोंड द्यावे लागत आहे. तोटा कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने गेल्या तीन वर्षांत ३,५०० नवीन बस गाडय़ा खरेदी केलेल्या नाहीत. बसच्या कमतरतेमुळे प्रवाशांना मोठय़ा अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रवासी संख्याही वाढली नाही.

एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्याच्या घडीला १९ हजार बस आहेत. यात साधी बस, मिडी बस, निमआराम, शिवनेरी, शिवशाही, अश्वमेध बस गाडय़ांचा ताफा आहे. एसटीच्या एकूण प्रवासी भारमानात दिवसा धावणाऱ्या साध्या बसचे सरासरी भारमान हे ७२ टक्के असून रातराणी साध्या बसचे ६४ टक्के भारमान आहे. त्या तुलनेत शिवशाही, शिवनेरी, मिडी व हिरकणी बसचे प्रवासी भारमान कमी भरते.

एसटीच्या गाडय़ांचे आयुर्मान हे नऊ वर्ष असते. यात सात वर्ष पूर्ण झालेल्या १,५०० बसची दर वर्षी पुनर्निर्मिती केली जाते. जुन्याच सांगाडय़ावर नवीन बसची बांधणी केली जाते आणि आणखी दोन वर्षे ती चालवण्यात येते. तर ज्या गाडय़ांना नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा १,५०० बस प्रत्येक वर्षी भंगारात काढून त्याऐवजी नवीन बस बाहेरून बांधून घेतल्या जातात. मात्र तोटा होत असल्याचे कारण पुढे करून महामंडळाने बाहेरून नवीन बस घेणे बंद केले आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत एकूण ४,५०० नवीन बस दाखल होऊ शकल्या नाहीत. महामंडळाने काही महिन्यांपूर्वी एक हजार शिवशाही बस ताफ्यात दाखल केल्या. त्यामुळे अजूनही ३५०० बसची कमतरता आहे.

एसटीची प्रवासी संख्या

वर्ष-          एकूण प्रवासी संख्या

२०१४-१५             २४५ कोटी

२०१५-१६             २४५ कोटी

२०१६-१७             २४४ कोटी

२०१७-१८             २४४ कोटी

२०१८-१९             २४४ कोटी