गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी मुंबई, ठाणे, पालघरमधून अखेर गुरुवारी एसटी बस रवाना झाल्या. १२ ऑगस्टपर्यंत ४०० बस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आल्या असून, आतापर्यंत तीन हजार प्रवाशांनी आरक्षण केल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. दहा दिवसांच्या विलगीकरणासाठी १२ ऑगस्टपूर्वी पोहचण्याचा अनेकांचा प्रयत्न असून त्यासाठी आरक्षणाची धडपड सुरू आहे.

मुसळधार पावसामुळे ५ ऑगस्टला कोकणात रवाना होऊ न शकलेल्या बससह एकूण २२ बस गुरुवारी सुटल्या. पहिली एसटी कुर्ला नेहरूनगर आगारातून २२ प्रवाशांना घेऊन मालवणसाठी रवाना झाली. सर्वाधिक आरक्षण १० व ११ ऑगस्टसाठी झाले असून, दोन दिवसांत १५० बस आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

राज्य सरकारने कोकणात जाणाऱ्यांसाठी १० दिवस विलगीकरणाचा निर्णय घेतला आहे. १२ ऑगस्टपूर्वी कोकणात पोहोचावे लागेल. १२ तारखेला रात्री १२ वाजेपर्यंत जे पोहोचतील त्यांना विलगीकरणात राहावे लागणार आहे. जे गणेशभक्त १२ तारखेनंतर जातील त्यांना ४८ तासांपूर्वी करोना चाचणी करणे बंधनकारक आहे. ही चाचणी निगेटिव्ह आली तरच कोकणात जाण्याची परवानगी मिळणार आहे. त्यामुळे अनेकांनी आरक्षणासाठी धडपड सुरू केली आहे.

दरम्यान, गट आरक्षणालाही गुरुवारपासून सुरुवात झाली असून तीन बस आरक्षणासाठी नोंदविल्या गेल्या आहेत. २२ प्रवाशांचे एकेरी तिकीट काढून थेट त्यांच्या गावापर्यंत एसटी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

खासगी वाहतूकदारांविरोधात कारवाई

* सणासुदीच्या दिवसांत एसटी महामंडळाचे त्या-त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्य:स्थितीचे भाडेदर विचारात घेऊन खासगी कंत्राटी परवाना वाहनाचेही संपूर्ण बससाठी प्रति किलोमीटर भाडेदराच्या ५० टक्क्य़ांपेक्षा अधिक राहणार नाहीत, असे कमाल भाडेदर परिवहन विभागाने एप्रिल २०१८ पासूनच निश्चित के ले आहे.

* तरीही त्याकडे खासगी प्रवासी वाहतूकदार दुर्लक्ष करून अवाच्या सवा दर आकारतात. गेल्या काही दिवसांपासून अशा तक्रारी परिवहन आयुक्त कार्यालयाकडे वाढल्या आहेत.

* याची दखल घेत शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षाही जादा दर आकारल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. त्यासाठी खासगी प्रवासी बसची तपासणी करण्याचे आदेश राज्यातील सर्व आरटीओंना दिले आहेत. त्यानुसार बसची तपासणीही केली जात असल्याची माहिती कार्यालयाकडून देण्यात आली.

* प्रवाशांनी त्याबाबतची तक्रार http://www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अथवा कार्यालयाच्या ०२२-२२६१४७२४ व ०२२-२२६१४७२७ या दूरध्वनीवर नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.