मुंबई : एसटी महामंडळाच्या वतीने विविध सामाजिक घटकांना प्रवासभाडे सवलत देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला १ एप्रिल २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

एसटी महामंडळाच्या वतीने विविध घटकांसाठी १ जून २०१९ पासून स्मार्ट कार्ड योजना सुरू करण्यात आली असून सद्य:स्थितीत ३० लाख ९७ हजार ७२६ जणांची नोंद झाली आहे. या योजनेसाठी ज्येष्ठ नागरिक, पुरस्कारप्राप्त व्यक्ती, विद्यार्थी तसेच रुग्णांना ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत स्मार्ट कार्ड मिळविणे आवश्यक होते. नोंदणीला मिळालेला प्रतिसाद पाहता ही मुदत वाढून देण्याची मागणी लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिकांनी केली होती. या मागणीनुसार ही मुदत ३१ मार्च २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे. १ एप्रिल २०२० पासून स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येत आहे. मासिक, त्रमासिक पासधारकांना स्मार्ट कार्ड १५ फेब्रुवारी २०२० पासून बंधनकारक असेल. तसेच विद्यार्थ्यांसाठी १ जून २०२० पासून स्मार्ट कार्ड बंधनकारक असणार आहे. दिव्यांगांसाठी अद्याप स्मार्ट कार्ड योजना लागू करण्यात आलेली नाही.