यंदा मुंबईतील विविध महाविद्यालयांमध्ये अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशाच्या कट ऑफमध्ये वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. फोर्ट येथील प्रसिद्ध झेवियर्स कॉलेजमध्ये अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशाच्या कट ऑफमध्ये तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. विज्ञान आणि कला या दोन्ही शाखांमध्ये अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या कट ऑफमध्ये मागच्यावर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे.

अन्य महाविद्यालयातही अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या मेरीट लिस्ट लवकरच लागणार असून तिथेही कट ऑफ वाढण्याची शक्यता आहे. सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशाची पहिली मेरीट लिस्ट बुधवारी जाहीर झाली. अकरावीतील विज्ञान शाखेचे प्रवेश ८०.८ टक्क्यांवर तर कला शाखेचे प्रवेश ८६.२ टक्क्यांवर बंद झाले. २०१७ मध्ये पहिल्या यादीत विज्ञान शाखेचे प्रवेश ७६.८ टक्के आणि कला शाखेत ८३.२ टक्क्यांवर प्रवेश बंद झाले होते.

यावर्षी दहावीत मोठया प्रमाणावर वेगवेगळया शाळा आणि वेगवेगळया बोर्डांचे विद्यार्थी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुणांनी उर्तीण झाले आहेत. त्यामुळे कट ऑफ वाढण्याची शक्यता आहे असे कॉलेजच्या प्राचार्यांचे मत आहे. यंदा राज्य बोर्डाने अतिरिक्त गुण कमी केले त्याचा परिणाम निकालावर पर्यायाने टक्केवारीवर झाला.