शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे-कलानगर येथील ‘मातोश्री’ या निवासस्थानात काम करणाऱ्या दोन आचाऱ्यांमध्ये भांडण झाल्याने एकाने दुसऱ्यावर चाकूहल्ला केला. यात एक आचारी आणि मोलकरीण जखमी झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी चाकूहल्ला करणाऱ्याला खेरवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

दहशतवाद्यांच्या नेहमीच ‘हिटलिस्ट’वर असणाऱ्या ठाकरे कुटुंबीयांच्या निवासस्थानाला सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई पोलिसांकडून २४ तास पहारा देण्यात येतो. मात्र आचाऱ्यांमध्ये झालेल्या चाकूहल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मातोश्रीच्या तिसऱ्या मजल्यावर उद्धव ठाकरे त्यांच्या कुटुंबासह राहतात. याच मजल्यावरील स्वयंपाकघरात शनिवारी ही घटना घडली. नेहमीप्रमाणे पंडित आणि सेवक हे दोन्ही आचारी स्वयंपाकघरात काम करीत होते. काम करताना या दोघांमध्ये थट्टामस्करी सुरू झाली. मात्र या मस्करीचे रूपांतर भांडणात झाले आणि संतापाच्या भरात सेवक याने भाजी कापायच्या चाकूने पंडितवर हल्ला केला. या वेळी स्वयंपाकघरात उपस्थित असलेल्या मंदा नावाच्या मोलकरणीने भांडण सोडवण्यासाठी प्रयत्न केला असता ती जखमी झाली. याप्रकरणी खेरवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.