नोकरभरतीसाठी इतर महत्त्वाच्या परीक्षांच्या तारखांशी ‘जुळण्याचा’ प्रकार स्टाफ सिलेक्शनच्या बाबतीत पुन्हा झाला आहे. स्टाफ सिलेक्शनच्या विविध पदांच्या भरतीसाठी रविवारी, २१ जून रोजी परीक्षा होणार आहे. मात्र, याच दिवशी स्टेट बँक ऑफ इंडियाचीही भरती परीक्षा आहे. त्यामुळे, अनेक परीक्षार्थी यापैकी एका परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे यापैकी एक परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी परीक्षार्थीकडून होते आहे. तर या प्रकारचे घोळ वारंवार उद्भवत असतात. त्यामुळे, स्वतंत्र आयोग स्थापून हे घोळ टाळावेत, अशी मागणी ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने’चे (मनविसे) सुधाकर तांबोळी यांनी केली आहे.