मुंबई विद्यापीठ परिसरातील घटना
मुंबई विद्यपीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये शुक्रवारी सत्यनारायणाच्या पूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काही कारणांवरून कर्मचारी-विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला आणि थोडय़ाच वेळात त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी कर्मचाऱ्यांकडून मारहाण आणि दगडफेक झाल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आला.
हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येच्या निषेधार्थ शुक्रवारी मुंबई विद्यपीठाच्या स्टुडंट फ्रंट या विद्यार्थी संघटनेतर्फे निदर्शने करण्यात येत होती. त्या वेळेस इतर विद्यार्थी संघटनांनीही सहभागी होत आंदोलनाला समर्थन दिले. आंदोलन संपल्यानंतर काही विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी हे कलिना कॅम्पसमधील महात्मा फुले भवनाजवळ गेले असता या ठिकाणी मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघातर्फे सत्यनारायण पूजा सुरू असल्याचे दिसले. मुंबई विद्यापीठ एक शैक्षणिक संस्था असून त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा धार्मिक कार्यक्रम होऊ नये, अशी मागणी करीत या ठिकाणी विद्यार्थी संघटनांनी हा कार्यक्रम बंद करण्यासाठी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींकडे विनंती केली. शांततेने सुरू असलेल्या या आंदोलनाचे रूपांतर काही क्षणातच वादात, नंतर धक्काबुकीत आणि नंतर मारहाणीत झाल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आला.
या प्रकरणी मुंबई विद्यापीठाच्या कर्मचारी संघाकडे विचारणा केली असता संघटनेचे रूपेश मालसुरे म्हणाले की, पूजा समितीतर्फे सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती. यावेळी दुपारच्या वेळेत काही युवक व युवती सत्यनारायण हाय हाय, बेकायदेशीर सत्यनारायण मुर्दाबाद अशा घोषणा देत दाखल झाले. सुरक्षारक्षक व पोलीस यंत्रणेने त्यांना अडवण्याचा व आवरण्याचा प्रयत्न केला. पण ते ऐकण्याच्या पलीकडे गेले होते. त्यानंतरही त्यांनी सत्यनारायण मुर्दाबाद या घोषणा चालू ठेवल्या व नंतर त्यांना परिसरातून सुरक्षा रक्षकांनी हुसकावून लावले, कोणालाही मारहाण झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.