बांद्रा कुर्ला संकुलातील (बीकेसी) कार्यालयांच्या कामाची वेळ बदलण्याची शक्यता आहे. मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने (एमएमआरडीए) बीकेसीतील कंपन्यांना कामाच्या वेळेत बदल करण्याचे आवाहन केले आहे. डी. एन. नगर-बीकेसीला जोडणाऱ्या मेट्रो- २बीचे काम लवकरच सुरु होणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीची समस्या निर्माण होऊ शकते. ही संभाव्य समस्या टाळण्यासाठी कंपन्यांनी कामाच्या वेळेत बदल करावेत, असे एमएमआरडीएने कंपन्यांना सुचवले आहे. एमएमआरडीएच्या या आवाहनाला बीकेसीमधील सरकारी कार्यालयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

बीकेसीमध्ये अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये आहेत. यामध्ये तब्बल दोन लाख जण काम करतात. या भागात दररोज २० हजार वाहने येतात. फेब्रुवारी २०१८ पासून या भागात मेट्रो- २बीचे काम सुरु होणार आहे. हा मार्ग डी. एन. नगर ते बीकेसी असा असेल. मेट्रो- २बीचे काम सुरु असताना बीकेसीतील रस्त्याच्या दोन्ही बाजूची एक-एक मार्गिका बंद राहणार आहे. त्यामुळे वाहतूककोंडी समस्या निर्माण होऊ शकते. याशिवाय कलानगर जंक्शन आणि बांद्रा-वरळी सी लिंकला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम २०१८ मध्येच सुरु होईल. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या आणखी गंभीर होईल. ही समस्या टाळण्यासाठी एमएमआरडीएने बीकेसीमधील कंपन्यांना कामाच्या वेळेत बदल करण्याची सूचना केली आहे.

कार्यालयांच्या वेळेत बदल करण्यात यावे, असे आम्ही बीकेसीमधील कंपन्यांच्या असोसिएशनला सुचवले असल्याची माहिती एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी दिली. ‘कार्यालयांच्या वेळा सकाळी ८ ते ११ दरम्यान करण्यात याव्यात. त्यामुळे मेट्रोच्या कामावेळी होणारी वाहतूककोंडी काही प्रमाणात टाळता येईल, असे आवाहन कंपन्यांना करण्यात आले आहे. जगभरात अशाचप्रकारे वाहतूककोंडी टाळली जाते आणि अनेक प्रगत देशांना याचा फायदा झाला आहे,’ असे दराडे यांनी म्हटले.

‘एमएमआरडीएने कार्यालयांच्या वेळेत बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आम्ही त्यावर सकारात्मक विचार करत आहोत,’ अशी माहिती बीकेसी प्रॉपर्टी ओनर्सच्या जयेश शहा यांनी दिली. एमएमआरडीएच्या या सुचनेमुळे वाहतूककोंडी टाळता येईल, असेही ते म्हणाले. याआधी २०१५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने वाहतूककोंडी टाळण्यासाठी कार्यालये, महाविद्यालये आणि शाळांच्या वेळेत बदल करण्याच्या सूचना केल्या होत्या.