नियमांचे उल्लंघन केल्यास परवाने रद्द करणार

तरुणाईचे आकर्षण ठरलेल्या दक्षिण मुंबईमधील फॅशन स्ट्रीटवरील नियम धाब्यावर बसविणाऱ्या १८५ बाकडेधारकांवर नोटीस बजावल्यानंतर आता उर्वरित स्टॉलधारकांवर पालिकेने कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी सुरू केली आहे. नियम धाब्यावर बसवून आखून दिलेली वेस ओलांडून अतिरिक्त जागेचा वापर करणाऱ्या उर्वरित २११ बाकडेधारकांवर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. नोटीस दिल्यानंतरही बाकडेधारकांनी आपली वेस ओलांडल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांचा परवाना रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

मुंबई महापालिकेने दक्षिण मुंबईमधील महात्मा गांधी रोडवर बॉम्बे जिमखान्याच्या समोरील पदपथावर ‘१ बाय १’ मीटर आणि ‘१.५ बाय १.५’ मीटर जागेची आखणी करून तब्बल ३९६ बेरोजगार तरुणांना फेरीच्या व्यवसायासाठी परवाना दिला होता.  मात्र अल्पावधीतच पालिकेची मर्यादारेषा ओलांडून बाकडेधारकांनी पदपथावरील अतिरिक्त जागेचा वापर सुरू केला. लोखंडी आणि लाकडी बांबूच्या साह्याने टांगण्या उभ्या केल्या. तसेच काही बाकडेधारकांनी पदपथावरच अतिरिक्त व्यवसाय सुरू केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पादचारी आणि रहदारीला अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार वारंवार पालिकेकडे करण्यात येत होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत पालिकेने गेल्या आठवडय़ात १८५ बाकडेधारकांवर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. मात्र ४८ तासांची मुदत उलटून गेल्यानंतरही बाकडेधारकांनी या नोटीसचे उत्तर पालिकेला सादर केलेले नाही.  त्यामुळे आता पालिकेने उर्वरित २११ बाकडेधारकांवर नोटीस बजावण्याची तयारी सुरू केली आहे.

यापूर्वीही पालिकेने फॅशन स्ट्रीटवर कारवाईचा बडगा उगारत बाकडेधारकांवर नोटीस बजावली होती. मात्र येथील ३० बाकडेधारकांनी न्यायालयात धाव घेतली असून हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही फॅशन स्ट्रीटवरील अनेक बाकडेधारकांनी पदपथावर अतिक्रमणे केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आता पालिकेने बाकडेधारकांवर कारवाईचा बडगा उगारत नोटीस बजावली आहे. मात्र बाकडेधारकांकडून नोटीसला उत्तर सादर होत नसल्यामुळे आता पालिकेने ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार या बाकडेधारकांवर कारवाई करण्यात येईल, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत १८५ बाकडेधारकांवर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली होती; पण या नोटीसचे उत्तर त्यांनी सादर केलेले नाही. आता परवान्यातील अटी आणि शर्तीचे उल्लंघन करणाऱ्या उर्वरित २११ फेरीवाल्यांवर नोटीस बजावण्यात येणार आहे. 

किरण दिघावकर साहाय्यक आयुक्त, ‘ए’ विभाग कार्यालय