मुंबईमध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे तिन्ही मार्गांवरील लोकल ट्रेनची वाहतूक ठप्प झाली आहे. आज सकाळपासूनच कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे मुंबईमधील मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. संध्याकाळच्या सुमारास पावसाचा जोर ओसरल्यानंतर काही विशेष लोकल चर्चगेटवरुन सोडण्यात आल्या आहेत. तर मध्य रेल्वेवरील वाहतुकही कोलमडलेलीच आहे. दरम्यान मध्य रेल्वेच्या घाटकोपर स्थानकामध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. याच गर्दीत ट्रेनमध्ये घुसण्याच्या प्रयत्नात चेंगराचेंगरी झाली.

मिळालेल्या माहितीनुसार बदलापुरला जाणारी स्लो लोकल घाटकोपर स्थानकामध्ये प्लॅटफॉर्म नंबर एकला आली. त्यावेळी मध्यभागी असणाऱ्या पुरुषांच्या प्रथम श्रेणी डब्ब्यासमोरील गर्दीने ट्रेनचा वेग कमी होत असतानाच ट्रेनमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. प्लॅटफॉर्मवरील गर्दी आणि उतरणाऱ्यांच्या गर्दीमध्ये काही प्रवासी प्लॅटफॉर्मवर पडले. या चेंगराचेंगरीमुळे प्लॅटफॉर्मवर एकच गोंधळ उडाला. हा सर्व घटनाक्रम स्थानकात उभ्या असलेल्या इतर प्रवाशांनी कॅमेरात कैद केला आहे. उभ्या असणाऱ्या प्रवाशांनी लगेचच प्लॅटफॉर्मवर पडलेल्या प्रवाशांना धीर देत उचण्याचा प्रयत्न केल्याचेही या व्हिडिओत दिसत आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नसून काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, जवळजवळ सहा तासांहून अधिक काळापासून मध्य रेल्वेच्या मार्गावरील ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक ठप्प आहे. राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याने येत्या ८ सप्टेंबरपर्यंत राज्यातील बहुतांश भागात पाऊस सक्रिय राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. येत्या ४८ तासांत मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने इशारा दिला आहे. मुंबईकरांनी समुद्रकिनारी जाऊ नये असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.