मुंबई : शहरी नक्षलवादाप्रकरणी अटकेत असलेल्या ८४ वर्षांच्या फादर स्टॅन स्वामी यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक असल्याचा वैद्यकीय अहवाल ब्रीच कॅ ण्डी रूग्णालयातर्फे  गुरुवारी उच्च न्यायालयात सादर करण्यात आला. त्यानंतर स्वामी यांना ५ जुलैपर्यंत तेथेच ठेवण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

दुसरीकडे स्वामी हे माओवादी आहेत तसेच त्यांना विविध आजार असल्याचा ठोस पुरावा नाही, असा दावा करत त्यांना जामीन मंजूर करण्यास राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) विरोध केला. तसेच स्वामी यांची जामिनाची मागणी फेटाळण्याची मागणी केली.

बनावट पुराव्यांच्या आधारे आपल्याला या प्रकरणी गोवण्यात आले असा दावा करत स्वामी यांनी जामिनाची याचिका केली होती. त्याचवेळी त्यांनी वैद्यकीय कारणास्तवही जामीन देण्याची मागणी केली होती. सरकारी रूग्णालयात दाखल होण्याऐवजी आपण मरणे पसंत करू, असेही त्यांनी न्यायालयाला सांगितले होते. त्यांचे वय आणि त्यांची ढसळलेली प्रकृती लक्षात घेत न्यायालयाने त्यांना ब्रीच कॅण्डी रूग्णालयात दाखल करण्यास परवानगी दिली होती. तेव्हापासून तेथेच उपचार घेत आहेत.