05 June 2020

News Flash

स्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर

राज्य सरकारने याबाबत अद्याप अधिसूचना जारी केलेली नाही.

(संग्रहित छायाचित्र)

 

संचारबंदी असल्याने भाजपचा बैठकीवर बहिष्कार

मुंबई : करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सदस्यांमध्ये सुरक्षित अंतर पाळण्याबाबत सूचनांचे पालन करीत मुंबई महापालिकेतील स्थायी समितीची बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीत सुमारे १५ ते १७ कोटी रुपयांच्या कामांचे सहा प्रस्ताव मंजूर करण्यात आले. रुग्णालयांना औषधांचा पुरवठा करणे, नाल्यांवरील कल्वर्टची दुरुस्ती आणि अग्निशमन दलाच्या लॅडरच्या दुरुस्ती आदी कामांचा त्यात समावेश होता. दरम्यान, जमावबंदीचे आदेश जारी असताना आयोजित केलेल्या या बैठकीवर भाजपने बहिष्कार घातला होता.

मुंबई महापालिका अधिनियम १८८८ मधील नियमानुसार प्रत्येक आठवडय़ामध्ये स्थायी समितीची बैठक आयोजित करणे बंधनकारक आहे. राज्य सरकारने अधिसूचना जारी करून स्थायी समितीची बैठक आयोजित करू नये, असे आदेश दिले असते तर बैठक स्थगित करता आली असती. परंतु राज्य सरकारने याबाबत अद्याप अधिसूचना जारी केलेली नाही. त्यामुळे स्थायी समितीची बैठक शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती, असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी स्पष्ट केले. मुंबईसह महाराष्ट्रामध्ये करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. केंद्र सरकारने सर्व राज्ये लॉकडाऊन केली आहेत. जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर स्थायी समितीची बैठक आयोजित करू नये, अशी मागणी भाजपने केली होती. मात्र शुक्रवारी स्थायी समितीची बैठक पार पडली. केवळ आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याचा आरोप करीत भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे या बैठकीस भाजपचा एकही नगरसेवक उपस्थित नव्हता. या बैठकीत १५ ते १७ कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर  करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. करोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयांना औषधांचा तातडीने पुरवठा करणे गरजेचे आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी नाल्यावरील कल्वर्टची दुरुस्ती होणेही आवश्यक आहे. शहरात अधूनमधून आगीच्या दुर्घटना घडत असतात. अशा वेळी अग्निशमन दलाचे लॅडर सुस्थितीत असणे गरजेचे आहे. त्यामुळे रुग्णालयांना औषधपुरवठा, नाल्यावरील कल्वर्टची दुरुस्ती आणि अग्निशमन दलाच्या लॅडरची दुरुस्ती याबाबतचे १५ ते १७ कोटी रुपयांचे सहा प्रस्ताव बैठकीत मंजूर करण्यात आले, असे यशवंत जाधव यांनी स्पष्ट केले. या बैठकीस मोजकेच नगरसेवक, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी उपस्थित होते. उपस्थितांमध्ये सुरक्षित अंतर राखून आसन व्यवस्था करण्यात आली होती. करोना रोखण्यासाठी पालिकेकडून कोणत्या उपाययोजना करण्यात येत आहेत याची माहिती सुरेश काकाणी यांनी सदस्यांना दिले. अग्निशमन दलाने हाती घेतलेल्या र्निजतुकीकरणाच्या मोहिमेबद्दल बैठकीत कौतुक करण्यात आले.

सदस्यांमध्ये तीन फुटांचे अंतर

राज्य शासनाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई आहे. तरीही अत्यंत महत्त्वाच्या विषयांसाठी विशेषत: पावसाळापूर्व कामांसाठी स्थायी समितीची बैठक आयोजित करताना कमीत कमी सदस्य संख्या ठेवावी आणि सदस्यांमध्ये तीन फुटांचे अंतर ठेवण्याचे बंधन प्रशासनाने घातले होते. ही बंधने पाळून बैठक आयोजित करण्यास प्रशासनाने मंजुरी दिली होती. त्यानुसार या बैठकीत आयोजन करण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2020 3:19 am

Web Title: standing committee bjp corona virus infection bmc akp 94
Next Stories
1 पाच हजार विलगीकरण प्रवाशी देशभर
2 बाळगू कशाला व्यर्थ कशाची भीती!
3 पोषक आहार देईल सुदृढ आरोग्य
Just Now!
X