प्रशासन नगरसेवकांना अंधारात ठेवत असल्याचा आरोप

मुंबई : मुंबईमधील करोना प्रतिबंध लसीचा तुटवडा आणि लसीकरणाचे नियोजन यावरून सध्या सुरू असलेल्या गोंधळाचे पडसाद स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत उमटले. प्रशासनाकडून लसीकरणाबाबत कोणतीच माहिती देत नसल्याचा आरोप करत स्थायी समिती सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

स्थायी समितीची बैठक बुधवारी सुरू होताच सभागृह नेत्या विशाखा राऊत आणि विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी मुंबईतील लसीकरणाची माहिती मिळत नसल्याच्या बाबीकडे स्थायी समितीचे लक्ष वेधले. मुंबईला लसीचा किती साठा मिळतो, किती वाजता मिळतो, नागरिकांना ती देण्यासाठी नियोजन कसे करण्यात येते, पहिली मात्रा घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे नियोजन कसे करण्यात येते, दुसरी मात्र कधी आणि कुठे दिली जाते याबाबत प्रशासनाकडून गरसेवकांना कोणतीच माहिती देण्यात येत नसल्याबद्दल विशाखा राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

प्रभागातील नागरिक सातत्याने नगरसेवकांच्या संपर्कात असतात. लसी कधी मिळणार अशी वारंवार विचारणा करीत असतात. परंतु प्रशासन माहितीच देत नसल्यामुळे नागरिकांना उत्तर देता येत नाही. यावरून नागरिकांचा रोष पत्करावा लागतो. प्रशासन लसीकरणाबाबत नगरसेवकांना अंधारात का ठेवते, असा सवाल त्यांनी यावेळी केला.

लसीचा साठा रात्री उशीरा उपलब्ध होतो याची नगरसेवकांना जाणीव आहे. मात्र त्याची माहिती नगरसेवकांना द्यावी. किती मात्रा मिळणार, लसीकरण केंद्रांवर त्यांचे वाटप कधी करणार, प्रत्यक्षात लसीकरण कधी सुरू करणार याची माहिती प्रशासनाने नगरसेवकांना द्यायलाच हवी, अशी मागणी रवी राजा यांनी केली.